एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार; सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांचे प्रतिपादन.
। लोकजागर वृत्त । फलटण । १७ ऑगस्ट २०२६ ।
कृषी विभागाच्या वतीने ‘महाविस्तार एआय दिवस’ ग्रामपंचायत सासकल (ता. फलटण) येथे उत्साहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यात प्रधान सचिव कृषी परिमल सिंह, आयुक्त महाराष्ट्र राज्य सुरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग जालिंदर पागिरे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात व सातारा जिल्ह्यात महाविस्तार एआयचे काम सुरू आहे.
‘महाविस्तार एआय’ ॲप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्याच्या वापराची माहिती होण्यासाठी हा विशेष दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी सासकलच्या उपसरपंच सोनाली मंगेश मदने, माजी उपसरपंच राजेंद्र घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत मुळीक आणि ग्रामविकास अधिकारी अशोक सापते उपस्थित होते.
या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी महाविस्तार एआय ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “हे ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. महाविस्तार एआय (MahavISTAAR-AI) हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित बनवलेले डिजिटल शेतकरी सहाय्यक ॲप आहे. पेरणीपासून ते बाजारपेठेत शेतमाल विक्रीपर्यंत लागणारी सर्व तांत्रिक आणि शासकीय माहिती हे ॲप शेतकऱ्यांना मराठी व स्थानिक भाषेत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.”
ॲपची मुख्य वैशिष्ट्ये व सुविधा:
एआय चॅटबॉट (AI Chatbot): शेतकरी बांधव शेतीविषयक कोणतेही प्रश्न मजकुराद्वारे किंवा आवाजाद्वारे (Voice/Text) विचारू शकतात. हे ॲप ‘डिजिटल मित्र’ म्हणून क्षणात उत्तरे देते.
कीड व रोग ओळख प्रणाली: पिकांच्या पानांवर किंवा भागांवर पडलेल्या रोगांचा किंवा किडीचा फोटो अपलोड करून त्यावर त्वरित उपाययोजना व औषध फवारणीची माहिती मिळते.
हवामान अंदाज: पावसाचा अंदाज, तापमान, वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता याबद्दलचा थेट व अचूक सल्ला मिळतो.
पीक व खत व्यवस्थापन: माती परीक्षणानुसार खताची योग्य मात्रा, बियाणे निवड आणि पीक संरक्षणाचे तंत्रज्ञान समजते.
बाजारभाव व शासकीय योजना: शेतमालाला विविध बाजार समित्यांमध्ये चालू असलेले ताजे भाव पाहता येतात. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान आणि डिजिटल सुविधांची माहिती सहज उपलब्ध होते.
शेतकरी आपल्या ‘फार्मर आयडी’द्वारे (Farmer ID) किंवा मोबाईल नंबर नोंदणी करून या ॲपमध्ये लॉगिन करू शकतात. कृषी विभाग प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या ॲपची माहिती देत नोंदणीसाठी मदत करत असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.
सासकल गावात आतापर्यंत एकूण ७२१ शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड केले असून गावात ९४.२४ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ॲप डाऊनलोड झालेले गाव म्हणून सासकलची ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला सासकल पंचक्रोशीतील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
