शेख काका व नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन; तरुण पिढी मनुवादी, जातीवादी शक्तींना सत्तेतून खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही
। लोकजागर वृत्त । सातारा । २१ ऑगस्ट २०२६ ।
आजची तरुण पिढी वाया गेलेली आहे, रिल्स पाहणारी अन् तासनतास मोबाईलच्या आहारी गेलेली आहे, अशी टीका करणारे सूर समाजात सर्रास पाहायला मिळतात. परंतु त्याच मोबाईलच्या व्यसनाने रस्त्यावरच्या लढाईला बळ दिलं. जंतर मंतरवरील आंदोलनाने या देशात पुन्हा एकदा युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली असून ही तरुण पिढी आगामी काळात मनुवादी, जातीवादी व भांडवलदारी शक्तीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा नवी दिल्ली येथील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेते व एआयएसएफचे राज्य संयोजक वैभव चोपकर यांनी दिला.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्मृतीशेष शेख बंडू इनामदार उर्फ शेख काका व स्मृतीशेष शहीद नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी विद्यार्थी आंदोलनातील नेत्या श्रावणी बुवा उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सुटाचे अध्यक्ष व एमफुक्टोचे महासचिव आर के चव्हाण होते. “जेन झी आंदोलनाची नवीन राजकीय भाषा आणि पुढील दिशा” या विषयावर या दोघांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शेख काका व नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन केले.
वैभव चोपकर यांनी आपल्या भाषणात एनटीए बरखास्त करण्याची मागणी करत, पेपर फुटू नयेत म्हणून केंद्र सरकारने कायदा आणला असला तरी मूळ मुद्द्यावर सरकार लक्ष देत नाही, असा आरोप केला. केंद्र सरकारची शिक्षण, रोजगार आणि शिक्षण माफिया यांच्या संदर्भात दुहेरी भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
श्रावणी बुवा यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाच्या परिस्थितीची माहिती दिली. आंदोलन चिरडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुंडांचा वापर केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसी अत्याचाराची माहिती दिली. युवाशक्ती आता गप्प बसणार नाही, केंद्रातील सरकारने त्यांच्या नादाला लागू नये, असे त्यांनी ठणकावले.
अध्यक्षीय भाषणात आर के चव्हाण म्हणाले की, या मुलांनी सर्वात महत्त्वाची कोणती क्रांती केली असेल तर ती म्हणजे या शासन व्यवस्थेबद्दल सामान्य माणसाच्या व विरोधी पक्षांच्या मनात जी भीती होती ती दूर केली. शालेय वयातील झेन अल्फा पिढीला त्यांच्या शैक्षणिक हक्काची जाणीव करून दिली, हेच या आंदोलनाचे यश आहे.
प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. त्यांनी शेख काका व नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा आढावा घेत, या दोघांनी युवक असताना सामाजिक व व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत घेतलेल्या भागाचे स्मरण केले.
मिनाज सय्यद यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. उदय चव्हाण यांनी आभार मानले, तर प्रणव पवार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास कलाकार किरण माने आवर्जून उपस्थित होते.
