नाईकबोमवाडी महाराष्ट्रातील अग्रगण्य औद्योगिक शहर म्हणून उभं राहणार; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा निर्धार

धोम बलकवडी उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचे भूमिपूजन; २३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार.

। लोकजागर वृत्त । फलटण । ७ सप्टेंबर २०२६ ।

जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत आपला तालुका हिरवागार झाला पाहिजे, सुसज्ज प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत, फलटणचा जिल्हा झाला पाहिजे यासाठी तुम्ही सोबत उभं राहिलं पाहिजे. नाईकबोमवाडी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य औद्योगिक शहर म्हणून उभं राहणार आहे हा माझा शब्द आहे, असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. नाईकबोमवाडी येथे धोम बलकवडी उजवा कालवा किलोमीटर १२८ ते १४७ मधील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचे भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, सातारा भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, विकास नाळे, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, विलासराव नलावडे, मिलिंद नेवसे, संजय कापसे, सचिन रणवरे, बापूराव चव्हाण, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अडचणी आणणाऱ्यापेक्षा सोडवणारा मोठा असतो त्यावर माझा विश्वास आहे. शंभू महादेव आपल्या पाठीशी आहेत. या ठिकाणी १०० टक्के उद्योग येणार आणि या भागाचं नंदनवन झाल्याचं येत्या काळात दिसणार आहे. नाईकबोमवाडीचे दिवस सर्वार्थाने बदलणार असून या भागातले रस्ते, पाणी, देवस्थानचे प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर निशाणा साधताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, जे होणार नाही म्हणतात ते नक्कीच होत असतं. आज फलटण-दहिवडी रस्ता, बारामती रस्ता, पालखी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. ज्यांनी विरोध केला ते लोक आज सोबत आहेत. नाईकबोमवाडी एमआयडीसी होऊ नये म्हणून बैठका घेतल्या, पण थोपवणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची ताकद पाठीशी असल्याने हे करू शकत असल्याचे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. माझ्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करण्यात त्यांनी वीस वर्षे घालवली. जलसंपदा मंत्री असून देखील निरा देवघरच पाणी खंडाळ्यातून पुढं येवून दिलं नाही. आपल्या दुष्काळी भागाचं पाणी बारामतीला जाणारं पाणी मी खासदार झाल्यावर 12 दिवसांत बंद करुन दाखवलं. पण हाच रणजितसिंह नाईक निंबाळकर आता बारामती तालुक्याला पाणी शोधून देणार आहे, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

या वेळी सचिन पाटील म्हणाले की, बारामतीचे पाणी थांबवल्यामुळे रणजितदादांना खासदारकी घालवावी लागली. पराभव झाल्यानंतरही ते थांबले नाहीत आणि २० वर्षे थांबलेले पाणी तालुक्यातील शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हा विचार त्यांनी केला. कॅनॉल कडेने गेला पण नाईकबोमवाडीला पाणी मिळत नव्हते, ९ गावे वंचित राहत होती, त्यासाठी बंदिस्त पाइपलाइन मंजूर करून घेतली असून त्यामुळे २३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या वेळी शिवरूपराजे खर्डेकर, माणिकराव सोनवलकर, जयकुमार शिंदे, यशवंत कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love