फलटण ग्रामीण हद्दीत ‘डीजे मुक्त मिरवणूक’ व ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

३३ गावांचा डीजे न वापरण्याचा, तर १५ गावांचा ‘एक गाव एक गणपती’चा आदर्श निर्णय; पोलीस प्रशासनाचे शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत शांतता, सामाजिक सलोखा व पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. फलटण ग्रामीण हद्दीतील एकूण ३३ गावे मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरे शिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, तातवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंबोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुरणे, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर, टाकळवाडा आणि दालवडी या गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा निर्णय घेतला आहे.

तर शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजाळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, मांझेरी आणि उपळवे या १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण, सामाजिक एकोपा वाढविणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन व शांततामय वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततामय, सुरक्षित व आदर्श गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्यासह पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love