माळजाई मंदिर येथे प्रौढ साक्षरता दिन उत्साहात साजरा; आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना बँकिंग फ्रॉडविषयी मार्गदर्शन!

लायन्स क्लब ऑफ फलटणचा उपक्रम; डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।

लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी प्रौढ साक्षरता दिन माळजाई मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना बँकिंग क्षेत्रातील फसवणूक व सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष रणजीत बर्गे, आयसीआयसीआय बँकेचे ब्रँच मॅनेजर किरण फडतरे, प्रफुल्लकुमार शिर्के, फलटण तालुका आजी-माजी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खरात, मार्गदर्शक सुनील शेवते, लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुनराव घाडगे, लायन्स आय हॉस्पिटलचे सचिव चंद्रकांत कदम आणि महेश गरवालीया आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचबरोबर विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. याची दखल घेत आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी किरण फडतरे व प्रफुल्लकुमार शिर्के यांनी उपस्थित आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना बँकिंग फ्रॉडपासून बचाव करण्याच्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ओटीपी, पिन, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा कोणतेही गोपनीय तपशील अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत, तसेच संशयास्पद फोन, मेसेज किंवा लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन बँक अधिकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे सचिव प्रमोद निंबाळकर यांनी केले. प्रौढ साक्षरता दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजातील ज्येष्ठ नागरिक व आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवहारांबाबत जागरूक करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी महेश गरवालीया यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे मंडळी व स्वातंत्र्यसैनिकांचे आभार मानले.

Spread the love