गळीत हंगाम २०२५-२०२६ मधील उसाचा दुसरा हप्ता देण्याची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा.
। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळीत हंगाम सन २०२५-२०२६ मध्ये गाळप केलेल्या उसाला अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना निवेदन देऊन शेवटचा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, स्वराज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड उपळवे, शरयू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कापशी आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी या चारही कारखान्यांना १० सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त ३२०० रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. गेल्या वर्षी कारखान्यांनी २०० रुपये अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते, परंतु साखरेचे दर वाढलेले असताना आणि कारखान्यांकडे हजारो क्विंटल साखर शिल्लक असताना ही वाढ अपुरी आहे. साखरेच्या वाढीव दराचा विचार करता आणखी ३०० रुपये वाढ देणे गरजेचे आहे. त्यामुळे २०० अधिक ३०० असे एकूण ५०० रुपये प्रतिटन हा दुसरा हप्ता कारखाना सिझन सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी ठोस मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी राजू शेट्टी यांच्या आदेशानेच हे आंदोलन उभे केले असल्याचे सांगत शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका मांडली. साखरेचे भाव वाढले, कारखानदारांनी कोट्यवधी कमावले पण शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे. जर कारखाना सुरू होण्यापूर्वी ५०० रुपये जमा झाले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही. ऊस वाहतूक बंद, साखर उचल बंद आणि गेटवर ठिय्या आंदोलन केले जाईल आणि यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखानदार व प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, डॉक्टर रवींद्र घाडगे, किरण भोसले, विक्रम पवार, बाळासाहेब शिपुकले, अजित लाळगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
