युवा अभियंता वरद इनामदारचा अनोखा उपक्रम; घरातील बाप्पापुढे कागदापासून साकारला पर्यावरणपूरक ‘वराह अवतार’

टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या सुंदर समई; ब्राह्मण गल्लीतील ओंकार अपार्टमेंटमध्ये कल्पक देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष.

। लोकजागर वृत्त । फलटण । १९ सप्टेंबर २०२६ ।

फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली येथील ओंकार अपार्टमेंटमधील युवा अभियंता वरद इनामदार याने पारंपरिक संस्कृती जपत आपल्या घरातील गणपतीसमोर विष्णूचा तिसरा अवतार म्हणजेच ‘वराह अवतार’ हा आकर्षक देखावा तयार केला आहे. या देखाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा वराह अवतार पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. फक्त कागदाचा वापर करून त्याने ही अत्यंत सुंदर आणि हुबेहूब कलाकृती साकारली आहे.

केवळ देखावाच नव्हे, तर त्या देखाव्यासमोर ठेवलेल्या दोन समईसुद्धा टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आल्या आहेत. अत्यंत कल्पक आणि सुंदर असलेली ही कलाकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. वरद इनामदार हा दरवर्षीच गणेशोत्सवामध्ये असे नवनवीन आणि संदेशात्मक पर्यावरणपूरक देखावे सादर करत असतो. त्याच्या या उत्कृष्ट कल्पकतेबद्दल आणि पर्यावरणाविषयी असलेल्या सामाजिक जाणीवेबद्दल त्याचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.

Spread the love