आज फैसला ! जिल्हा बँकेत संजीवराजेंची ‘शिट्टी’ घुमणार की समशेरसिंहांचे ‘हेलिकॉप्टर’ झेपावणार?

। लोकजागर वृत्त । फलटण । ०३ नोव्हेंबर २०२६ ।

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामध्ये फलटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण तालुका विकास सोसायटी मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर गटाचे तथा शिवसेनेचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरलेले फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर या झालेल्या ’हाय-व्होल्टेज’ लढतीत संजीवराजे यांची ’शिट्टी’ घुमणार की समशेरसिंह यांचे ’हेलिकॉप्टर’ थेट विजयाची झेप घेणार, याकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

अवघ्या 131 मतदारांचे गणित; प्रत्येक मतासाठी तगडी फिल्डिंग

फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात एकूण 131 मतदार असून विजयाचा टप्पा ओलांडण्यासाठी उमेदवाराला 65 पेक्षा जास्त मते मिळवणे आवश्यक आहे. मतदार संख्या अत्यंत मर्यादित असल्याने एका-एका मतासाठी दोन्ही बाजूंनी अतिशय गुप्त आणि काटेकोर रणनीती आखली गेली होती. फलटण तालुक्याच्या राजकारणातील दोन प्रतिस्पर्धी गट पुन्हा एकदा आमने – सामने आल्याने या निमित्ताने फलटणमधील पारंपारिक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

रणजितदादांच्या ’बिनविरोध’ एंट्रीने वाढली चुरस

या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून बिनविरोध बाजी मारली आहे. त्यामुळे आता आपले बंधू समशेरसिंह यांना सोसायटी मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे, विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कायदेशीर अडचणीमुळे ऐनवेळी माघार घेतल्याने, फलटण तालुक्यातील सत्ता राखण्याची सर्वस्वी जबाबदारी आता श्रीमंत संजीवराजे यांच्या खांद्यावर आली आहे.

आज फैसला

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया आज 3 नोव्हेंबर रोजी पार पडत असून मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल. आता फलटणच्या मातीत शिट्टीचा आवाज घुमणार की हेलिकॉप्टर उंच उड्डाण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Spread the love