ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रंगल्या गप्पा; ’लोकजागर’ कार्यालयात जुन्या स्मृतींना उजाळा.
। लोकजागर । फलटण । २३ एप्रिल २०२६ ।
शहरातील रस्ते ६ महिन्यात सुधारू असा शब्द आम्ही दिलेला आहे. त्यानुसार येत्या 1 महिन्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असून, मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्तेही तुम्हाला नक्कीच खड्डेमुक्त दिसतील, अशी ग्वाही फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
येथील ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील शंकर मार्केट परिसरातील ‘लोकजागर’ कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये फलटणकरांना खराब रस्त्यांचा त्रास खूप होत आहे, असे बेडकिहाळ यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर नगराध्यक्षांनी रस्ते सुधारणेबाबतचा विश्वास व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, भाजप गटनेते रोहित नागटिळे उपस्थित होते.

प्रशासकीय कामाचा वेग आणि नियोजन: नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, गेल्या 4 महिन्यात मी केवळ 8 दिवस सुट्टी घेतली आहे. माझ्या सहीवाचून सर्वसामान्यांचे कोणतेही काम थांबू नये, यासाठी मी कटाक्षाने काळजी घेत असून प्रसंगी रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज सुरू असते. शहरातील वाहतुकीची कोंडी, भाजी मंडईचे नियोजन, वाचनालय, अद्ययावत अभ्यासिका आणि पत्रकारांसाठी सुसज्ज सभागृहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम सुरू असून या सुविधा लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
जुन्या स्मृतींना उजाळा: यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ भावूक झाले. ते म्हणाले की, लोकनेते स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच कार्यालयातून ‘युवक संघटने’च्या माध्यमातून झाली होती. आज त्यांचा मुलगा ‘नगराध्यक्ष’ म्हणून या ठिकाणी आला आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो.
नगराध्यक्षांनी यावेळी रविंद्र बेडकिहाळ यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन प्रशासनाला सतत मिळत राहो, अशी इच्छा व्यक्त केली. मी माझ्या प्रत्येक सहकार्याला कामाची विभागणी करून दिली असून, प्रत्येक जण आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
