दोन कुत्र्यांचा फडशा; वनविभागाने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी.
। लोकजागर । फलटण । ४ मे २०२६ ।
जावली (ता. फलटण) परिसरातील गोफणेमळा येथे पाळीव कुत्र्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील दोन कुत्र्यांचा हिंस्र प्राण्याने फडशा पाडला असून, हा प्रकार बिबट्यानेच केला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नेमकी घटना काय? रविवार, दिनांक ३ मे रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उद्धव गोफणे यांच्या कुत्र्यावर एका हिंस्र प्राण्याने झडप मारून त्याला पकडून नेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी याच वस्तीवरील बबन गोफणे यांच्याही कुत्र्यावर अशाच पद्धतीने हल्ला झाला होता. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांची मागणी: या घटनेमुळे शेतात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचे सावट आहे. वनविभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन परिसरात पाहणी करावी आणि या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोफणेमळा तसेच जावली परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
