पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ खपवाल तर सावधान; सातारा अन्न व औषध प्रशासनाचा कडक इशारा

। लोकजागर । सातारा । ५ मे २०२६ ।

सातारा जिल्ह्यातील काही हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते पनीरऐवजी त्याला पर्याय म्हणून स्वस्त अशा “चीज ॲनालॉग”चा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे समोर आले आहे. पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन्ही पदार्थ दिसायला जरी सारखे असले तरी त्यांचे पोषणमूल्य पूर्णपणे भिन्न आहे. मात्र, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने त्यांची मोठी दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आता अशा विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या नवीन निर्देशांनुसार, आता सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना त्यांच्या मेन्यूकार्डवर आणि डिस्प्ले बोर्डवर पनीर किंवा चीज ॲनालॉग यांपैकी नेमका कशाचा वापर केला आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, उत्पादकांनी त्यांच्या विक्री बिलामध्ये अन्नपदार्थाचा स्वयंस्पष्ट उल्लेख करावा आणि पनीर किंवा चीज ॲनालॉगची विक्री करताना ती लेबल असलेल्या मूळ पॅकबंद पाकिटातूनच करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही उत्पादक किंवा विक्रेत्याने या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आता ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक पारदर्शकता ठेवावी लागणार आहे.

Spread the love