महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; खरेदीची मर्यादा आणि मुदत वाढवली

। लोकजागर । फलटण । ५ मे २०२६ ।

महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मधील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा आता वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत (MSP) सुरक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य आणि हमीभाव मिळावा, या उद्देशाने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. खरेदी मर्यादेसोबतच सरकारने हरभरा खरेदीची अंतिम मुदतही वाढवली असून, आता २९ मे २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना आपला माल सरकारी केंद्रांवर विकता येणार आहे. या मुदतवाढीमुळे जे शेतकरी काही कारणास्तव वेळेत आपला शेतीमाल विकू शकले नव्हते, त्यांना आता आधारभूत किमतीचा लाभ घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

राज्यातील हजारो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिक पाठबळ देणारा ठरणार आहे. वाढीव मर्यादा आणि मुदतवाढीमुळे बाजारातील दरावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

Spread the love