बोगस डॉक्टर आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन.
। लोकजागर । सातारा । ५ मे २०२६ ।
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने आता कंबर कसली आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी आणि कुठेही असे डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर विलंब न करता तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या ‘बोगस डॉक्टर नियंत्रणासाठीच्या जिल्हास्तरीय समितीच्या’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शोध मोहिमेची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये केवळ क्लिनिक्सच नव्हे, तर पॅथॉलॉजी लॅबचीही कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शोध मोहिमेत स्थानिक पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या सूचनाही पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनीही या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. जर कोणाला आपल्या परिसरात बोगस डॉक्टर किंवा अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास, त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या या संयुक्त शोध मोहिमेमुळे जिल्हयातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
