मान्सूनपूर्व तयारी: २० मे पर्यंत आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश

हवामान खात्याचा कमी पावसाचा अंदाज; पाणी टंचाईचा आराखडा तयार ठेवण्याच्या सूचना.

। लोकजागर । सातारा । ५ मे २०२६ ।

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला अद्यावत आराखडा २० मे २०२६ पर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आणि सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तालुका आणि गावपातळीवर १५ मे पूर्वी पूर्वतयारी बैठका घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून यंदा हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने त्या दृष्टीने टंचाईचा आराखडाही तयार करावा आणि पाणी पुरवठा व सिंचन विभागाने आपल्या पाण्याच्या स्त्रोतांचे मॅपिंग तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रत्येक विभागाने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून १ जूनपासून २४x७ नियंत्रण कक्ष सुरू करणे बंधनकारक असून आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या शोध व बचाव साहित्याची चाचणी २५ मे पूर्वी पूर्ण करावी. महसूल विभागाने धोकादायक ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करणे, नालेसफाई, पूल दुरुस्तीची कामे पूर्ण करणे आणि पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्ते आणि पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत आणि दरड कोसळल्यास ती हटवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणासाठी औषधसाठा आणि पाणी शुद्धीकरणाची सोय करून रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवावी, तर पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्कालीन आराखडे तयार करून नदीकाठच्या गावांना वेळेवर इशारा देण्याचे नियोजन करावे.

महावितरणने अतिवृष्टीच्या काळात अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी ठेवून झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. पुरवठा विभागाने दुर्गम भागात धान्यसाठा ठेवावा, शिक्षण विभागाने शाळा स्थलांतरासाठी तयार ठेवाव्यात आणि पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी पूनर्वसन स्थलांतरासाठीचे शेड सुस्थितीत ठेवण्याचे आणि आवश्यक तिथे नवीन शेडची कामे मार्गी लावण्याचे निर्देश देत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य पूरस्थिती व आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी तयारी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

Spread the love