दिलेला शब्द शंभर टक्के पाळणारा नेता म्हणजे समशेरदादा : कु. सिद्धाली शहा
। लोकजागर विशेष वृत्त । फलटण । १५ जून २०२६ ।
फलटण शहरातील तेली गल्ली येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या पाचवीला पूजलेला आणि अत्यंत जिव्हाळ्याचा बनलेला अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. “या भागातील पाण्याचे संकट दूर करण्यासाठी नव्याने मुख्य पाण्याची पाईपलाईन टाकून दिली जाईल,” असा शब्द फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तेली गल्लीतील नागरिकांना दिला होता. हा शब्द केवळ आश्वासन न ठरता, नगराध्यक्षांनी अवघ्या एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम पूर्ण करून दाखवले आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे ‘दिलेला शब्द शंभर टक्के पाळणारा नेता म्हणजे समशेरदादा’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत फलटण नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी नगराध्यक्षांच्या ‘धडाकेबाज’ कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे.
तेली गल्ली भागात गेल्या अनेक वर्षांपासून योग्य दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने येथील महिला भगिनी व नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या आधी हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जायची, वारंवार खोदाई केली जायची; पण काही दिवसांत परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ व्हायची. या कायमच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. ही गंभीर समस्या ओळखून नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी थेट नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे या प्रश्नाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. जनसामान्यांच्या या वेदनेची त्वरित दखल घेत नगराध्यक्ष समशेरदादांनी तातडीने या ठिकाणी जुनी गळती असणारी यंत्रणा बदलून थेट नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले.
अॅक्शन मोडवर काम पूर्ण; योग्य दाबाने पाणी सुरू:
नगराध्यक्षांच्या आदेशानंतर नगरपालिकेची यंत्रणा तात्काळ ‘अॅक्शन मोड’वर आली. नुकतेच तेली गल्ली येथे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले असून, त्यावरून प्रत्येक घराची नळ जोडणी (कनेक्शन) देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे आता या भागातील नागरिकांना अत्यंत योग्य दाबाने आणि पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी मिळू लागले असून, कित्येक वर्षांचे पाण्याचे मोठे संकट कायमचे निकाली निघाले आहे. हे ऐतिहासिक काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष समशेरदादा यांच्यासह पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती कु. सिद्धाली शहा यांनी दिली.
समशेरदादांसारखे नेतृत्व पाठीशी असल्याने विकास सुकर – कु. सिद्धाली शहा:
याप्रसंगी बोलताना नगरसेविका कु. सिद्धाली शहा म्हणाल्या की, “आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जेव्हा समशेरदादांसारखे खंबीर आणि विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व पाठीशी खंबीरपणे उभे राहते, तेव्हा कुठलीही कठीण समस्या सहज सोडवणे शक्य होते. येत्या काळात प्रभागातील सर्वच रस्त्यांच्या दुतर्फा स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा आमचा मानस आहे. यामुळे एकाच पाईपलाईनवर येणारा पाण्याचा लोड कमी होईल आणि प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी पूर्ण दाबाने मिळेल.” ही समस्या सोडवण्यासाठी जितेंद्र यांच्यासह सर्व स्थानिक गल्लीतील नागरिकांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, अनेक वर्षांपासूनचा हा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न अत्यंत प्रतिष्ठेने आणि तातडीने सोडवल्याबद्दल तेली गल्लीतील जितेंद्र तेली, दिलीप तेली, जितेंद्र शहा, रूपाली परदेशी, भगवान परदेशी, सचिन परदेशी, संतोष परदेशी व अबालवृद्धांनी व महिलांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा आणि नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांना धन्यवाद दिले आहेत.
