बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि जयपूर फूट शिबिरांचे नियोजन; ‘लाईफ लाईन’मधील डायलिसिस मशीन्सची संख्या वाढवण्यावर भर.
। लोकजागर । फलटण । १४ जून २०२६ ।
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष’ व ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’चे प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी नुकतीच फलटण येथे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या ‘सरोज व्हीला’ (लक्ष्मीनगर, फलटण) या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान सातारा जिल्हा आणि प्रामुख्याने फलटण तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा कशी मोठ्या प्रमाणात सक्रिय करता येईल, याविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत प्रामुख्याने तालुक्यातील गरजू बालकांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात ‘हृदयाच्या शस्त्रक्रिया’ (Pediatric Heart Surgeries) आयोजित करणे, तसेच दिव्यांग बांधवांसाठी ‘जयपूर फूट’ (कृत्रिम अवयव) रोपण संबंधी भव्य शिबिरे भरवण्याबाबत प्राथमिक नियोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे फलटण व ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, फलटणमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, डायलिसिस सुविधांचा विस्तार करण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. सध्या फलटण आरोग्य मंडळ संचालित ‘लाईफ लाईन हॉस्पिटल’मध्ये रुग्णांसाठी आठ डायलिसिस मशीन्स कार्यरत आहेत, मात्र रुग्णांची गरज पाहता या मशीन्सची संख्या आगामी काळात वाढवण्यासंदर्भात तांत्रिक व प्रशासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन श्री. मंगेश चिवटे यांनी दिले.
याप्रसंगी मंगेश चिवटे यांच्यासोबत हवेली पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती श्री. युवराज काकडे हे देखील उपस्थित होते. निवासस्थानी आलेल्या दोन्ही मान्यवरांचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांच्या वतीने स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान केला. या महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक बैठकीदरम्यान फलटणमधील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य हे देखील उपस्थित होते व त्यांनी स्थानिक आरोग्य गरजांविषयी तांत्रिक माहिती दिली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या या सक्रियतेमुळे फलटण तालुक्यातील आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
