श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम; रविवार २२ फेब्रुवारी रोजी शिवभक्तांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन
। लोकजागर । फलटण । दि. २१ फेब्रुवारी २०२६ ।
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभागाच्या वतीने फलटण शहरात भव्य ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत महाराजा मंगल कार्यालय येथे हा स्तुत्य उपक्रम पार पडणार असून, या माध्यमातून शंभूराजांच्या बलिदानाला रक्तांजली अर्पण केली जाणार आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच बलिदानाची आठवण आणि प्रेरणा समाजातील तरुणांमध्ये तेवत ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिबिर राबविण्यात येत आहे. “विसरू कसे बलिदान, चला करूया रक्तदान” या घोषवाक्याने संपूर्ण शहर आणि तालुक्यात या उपक्रमाचा प्रचार केला जात आहे. या महायज्ञात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेट देण्यात येणार असून, यावेळी ऐतिहासिक संदर्भांवर आधारित महत्त्वाचे साहित्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने फलटण तालुक्यातील तमाम शिवभक्त, युवक आणि ग्रामस्थांना या मानवतावादी कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्ताच्या एका थेंबाने एखाद्याचे प्राण वाचू शकतात, हीच खरी मानवसेवा असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. या शिबिराच्या माध्यमातून जमा होणारे रक्त गरजूंसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून, युवकांनी या ‘रक्तदान महायज्ञात’ आपली समिधा अर्पण करावी, असे आवाहन फलटण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
