श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने फलटण नगरी दुमदुमली; अक्कलकोट पालखी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात स्वागत

। लोकजागर । फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ ‘पालखी पादुका परिक्रमा’ सोहळ्याचे काल सायंकाळी ६ वाजता फलटण नगरीत आगमन झाले. मलठण येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात या पालखीचे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

पादुका पूजन आणि मिरवणूक: पालखी सोहळा प्रमुख संतोष भोसले, सेवेकरी संजूकाका कुलकर्णी, कल्याणी मामा व उपस्थित वारकरी भाविकांचे स्वागत फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी स्वामींच्या पादुकांची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “श्री स्वामी समर्थ” च्या जयघोषात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीचा मार्ग आणि उत्साह: मलठण येथील मंदिरातून निघालेली ही मिरवणूक श्री हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजे उमाजी नाईक चौक, गजानन चौक, शंकर मार्केट आणि श्रीराम मंदिर मार्गे अहिल्यानगर येथे रात्री ८ च्या सुमारास पोहोचली. मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या, तर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून स्वामींचे स्वागत करण्यात आले.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी: अहिल्यानगर येथे भाविक श्रीकांत जाधव यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून, उद्या सकाळी हा पालखी सोहळा नातेपुते आणि वालचंदनगरकडे मार्गस्थ होणार आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटणचे प्रमुख संजय चोरमले यांच्यासह सर्व सेवेकऱ्यांनी या सोहळ्याचे नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजन केले.

Spread the love