। लोकजागर । फलटण । ७ मे २०२६ ।
फलटण येथील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कविवर्य नारायण सुर्वे पुरस्काराचे मानकरी सुरेश पां. शिंदे यांच्या लेखन प्रवासाला साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या रूपाने एक मोठी पावती मिळाली आहे. नेमाडे यांनी शिंदे यांना नुकतेच एक विशेष पत्र पाठवून त्यांच्या ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीचे कौतुक केले आहे. ही कादंबरी त्यांच्या गाजलेल्या ‘सर्ज्या’ या कादंबरीप्रमाणेच श्रेष्ठ असल्याचे मत नेमाडे यांनी या पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
नेमाडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी ‘सत्याचा आसूड’ ही कादंबरी वाचली असून ती त्यांना मनापासून आवडली आहे. विशेषतः या कादंबरीमध्ये वापरलेली गावाकडची ग्रामीण भाषा अतिशय उत्तम आणि नैसर्गिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कादंबरीच्या तांत्रिक अंगावर भाष्य करताना त्यांनी सुचवले की, संवाद आणि तपशील जास्त आल्यामुळे कथानकातील ‘मी’ या पात्राला जागा काहीशी कमी मिळाली आहे. यापुढील लेखनात एखादे मध्यवर्ती सूत्र पक्के धरून नवीन कादंबरी लिहावी, अशी मार्गदर्शक सूचनाही त्यांनी यावेळी केली.
साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या भालचंद्र नेमाडे यांनी स्वतःहून कादंबरीची दखल घेऊन पत्र पाठवणे, हा आपला मोठा बहुमान असल्याचे सुरेश शिंदे यांनी मानले आहे. नेमाडे सरांच्या या पत्रामुळे आपल्या लेखनाला एक नवी ऊर्जा मिळाली असून त्यांच्याबद्दल शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. साहित्यातील हा दुर्मिळ संवाद सध्या फलटणच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
