रचले नवे रेकॉर्ड; प्रतिकुलतेतही युनाम शिखर केले सर
। लोकजागर । सातारा । ७ जून २०२६ ।
‘धैर्यं सर्वेषु कालेषु आवश्यकम’ (संकट समयी धैर्य अत्यंत आवश्यक असते) या उक्तीला केवळ नावानेच नव्हे, तर आपल्या अचाट कर्तृत्वाने सार्थ ठरवत सातारची ‘अजिंक्यकन्या’ धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने हिमालयातील अत्यंत कठीण मानले जाणारे ‘युनाम शिखर’ सर करण्याची धुरंधर कामगिरी केली आहे. एकापाठोपाठ एक दुर्गम शिखरे पादाक्रांत करणारी अवघ्या १४ वर्षांची धैर्या आता गिर्यारोहण क्षेत्रात कमालीची निष्णात आणि कुशल बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर साताऱ्याचा डंका वाजवणाऱ्या धैर्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण सातारकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
बालपणापासूनच डोंगर-दऱ्या आणि कठीण शिखरे चढण्याची आवड असलेल्या धैर्याचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तिने अत्यंत आव्हानात्मक अशा ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’वर (५,५४५ मीटर) पालकांशिवाय यशस्वी चढाई केली होती. ही मोहीम फत्ते करणारी ती देशातील बहुदा एकमेव अल्पवयीन मुलगी ठरली. त्यानंतर तिने आफ्रिका खंडातील सर्वोच्च ‘किलीमंजारो’ (५,८५० मीटर) हे शिखर उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान आणि ऑक्सिजनच्या कमतरतेशी झुंजत सर केले. एवढ्यावरच न थांबता, तिने काही महिन्यांपूर्वी युरोप खंडातील सर्वोच्च ‘माऊंट एलब्रुस’ (५,६४२ मीटर) शिखरावरही विजय मिळवला.
अपयशाला बनवले यशाची पायरी; ‘बॅक टू बॅक’ आव्हानात्मक चढाई: जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशातील मोहिमा कठीण झाल्याने धैर्याने भारतातील शिखरे सर करण्याचा चंग बांधला. गत महिन्यात ती हिमाचल प्रदेशातील ‘फ्रेंडशिप शिखर’ (१७,३५२ फूट) सर करण्यासाठी सरसावली होती. मात्र, शिखर अवघे ३०० ते ४०० मीटर अंतरावर असताना प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे तिला अगदी शेवटच्या टप्प्यात माघार घ्यावी लागली. डोळ्यांसमोर असलेले शिखर सर करता न आल्याची खंत तिच्या मनात होती; पण तिने या अपयशाने खचून न जाता, त्यालाच आपली ताकद बनवले. थांबायचे नाही, आणखी उंच भरारी घ्यायची, हा निर्धार करून तिने लगेचच फ्रेंडशिप पीकपेक्षाही उंच आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले ‘युनाम शिखर’ सर करण्याचे धाडस दाखवले.
६,१११ मीटर म्हणजेच तब्बल २०,०४९ फूट उंचीचे हे शिखर सर करण्याची मोहीम तिने २२ मे रोजी सुरू केली होती आणि ५ जून रोजी ती यशस्वीपणे पूर्णत्वास नेली. हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वत रांगेत, मनालीपासून पुढे बारालाचा ला खिंडीजवळ असलेले हे ६ हजार मीटरहून अधिक उंचीचे शिखर सर करणे अत्यंत तांत्रिक कौशल्याचे मानले जाते. फ्रेंडशिप पीकच्या अपूर्ण स्वप्नानंतर लगेचच ‘बॅक टू बॅक’ युनाम शिखरावर केलेली ही यशस्वी चढाई धैर्याची जिद्द, चिकाटी आणि अदम्य आत्मविश्वासाची अनोखी कहाणी सांगते.
मार्गदर्शन आणि कौटुंबिक पाठबळ: धैर्याने आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेमुळे हे शिखर सर केले. तसेच डॉ. सुरभी लिऊआ, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबले यांचेही तिला सातत्याने मार्गदर्शन लाभले. गेल्या ६ वर्षांपासून ट्रेकिंगचा कठोर सराव करणाऱ्या धैर्याने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, ती साताऱ्यातील गुरुकुल शाळेत नुकतीच इयत्ता नववीत प्रविष्ट झाली आहे. सातारा जनता सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची ती सुकन्या आहे.
धैर्याने आतापर्यंत सर केलेली प्रमुख शिखरे व मोहिमा
- एव्हरेस्ट बेस कॅम्प (नेपाळ)
- माऊंट किलीमंजारो (आफ्रिका)
- माऊंट एलब्रुस (युरोप)
- माऊंट युनाम (भारत – ६,१११ मीटर)
- महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर, गिरनार आणि सह्याद्रीतील अनेक दुर्गम गडकिल्ले
- नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा
प्रतिक्रिया: ‘धरासे उठकर गगन को छुआ…’
“पोटच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे कर्तव्य आम्ही पालक म्हणून करत आहोत, तर आई-बाबांनी दिलेले ‘धैर्या’ हे नाव सार्थक करण्याचे कर्तव्य ती स्वतः पार पाडत आहे. आज तिने केवळ विनोद आणि ज्योती कुलकर्णी यांची कन्या एवढीच मर्यादित ओळख न ठेवता, स्वतःची ‘अजिंक्यकन्या’ आणि ‘शिखरकन्या’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. ‘धरासे उठकर गगन को छुआ…’ अशी तिची कामगिरी असून, तिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.” – विनोद कुलकर्णी व सौ. ज्योती कुलकर्णी (धैर्याचे माता-पिता)
