मान्सून कोकणात दाखल, पण प्रगतीचा वेग मंदावला; विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात कमाल तापमान राहणार उच्च.
। लोकजागर । मुंबई / फलटण । ७ जून २०२६ ।
दक्षिण कोकणामध्ये मान्सूनचे आगमन झाले असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आगामी ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, या सुरुवातीच्या प्रगतीनंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या पुढे सरकण्याचा वेग कमी होण्याची शक्यता सध्याच्या हवामान अंदाजावरून दिसून येत आहे. परिणामी, या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वत्र समाधानकारक व व्यापक पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.
हवामान खात्याच्या सद्यस्थितीनुसार, किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस स्थानिक आणि मर्यादित स्वरूपाचा असल्याने तो मोठ्या क्षेत्रावर पेरणीसाठी पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. या दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च पातळीवर राहणार आहे. विदर्भ व खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ते ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या केवळ स्थानिक वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी शेतात पेरणीची घाई करू नये; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसादरम्यान विजांच्या कडकडाटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी झाडांखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे पूर्णपणे टाळावे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
