महाराजा मल्टीस्टेटच्या स्वीकृत व तज्ज्ञ संचालक पदी निलेश मोरे आणि हनुमंत जगताप यांची बिनविरोध निवड

। लोकजागर । फलटण । ११ जून २०२६ ।

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेल्या आणि सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’च्या स्वीकृत व तज्ज्ञ संचालक पदी निलेश प्रकाशराव मोरे आणि हनुमंत विलास जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या दोन्ही अनुभवी अभ्यासू व्यक्तित्वांच्या निवडीमुळे संस्थेच्या संचालक मंडळाची ताकद अधिक वाढली असून, सभासदांमधून या निवडीचे जोरदार स्वागत केले जात आहे.

या विशेष निवड प्रक्रियेप्रसंगी संस्थेचे चेअरमन दिलीपसिंह भोसले आणि व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच संस्थेचे विद्यमान संचालक तुषार गांधी, दीपराज तावरे, कुमार भट्टड, डॉ. विलास रसाळ, हेमंत फुले आणि अमोल सस्ते या मान्यवरांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

९३३ कोटींच्या उलाढालीसह यशाचे शिखर: महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने अत्यंत कमी कालावधीत सहकार क्षेत्रात आपला मोठा दबदबा निर्माण केला आहे. आजमितीस संस्थेशी सुमारे ५ हजार सभासद जोडले गेले असून, संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ९३३ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्वाखाली संस्थेने अत्यंत पारदर्शक कारभार, काटकसर आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य सभासद व ठेवीदारांचे हित सर्वोच्च मानून काम केले आहे. याच विश्वासार्हतेच्या बळावर महाराजा मल्टीस्टेट सातत्याने प्रगतीपथावर अग्रेसर राहिली आहे.

या नवनियुक्त स्वीकृत व तज्ज्ञ संचालकांच्या स्वागत समारंभाप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संदीप जगताप यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि नवनियुक्त संचालकांचे शब्दसुमनांनी स्वागत केले, तसेच संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे शेवटी आभार मानले. निलेश मोरे आणि हनुमंत जगताप यांच्या बिनविरोध निवडीबद्दल सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Spread the love