निरा उजवा कालवा ४५ दिवस बंद; धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने आणि साठवण तलावातील साठा मर्यादित असल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय.
। लोकजागर विशेष वृत्त । फलटण । १६ जून २०२६ ।
फलटण शहरातील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असलेला ‘निरा उजवा कालवा’ दिनांक १२ जून २०२६ रोजीपासून बंद करण्यात आला आहे. हा कालवा आगामी साधारण ४५ दिवस बंद राहणार आहे. सद्यस्थितीत फलटण नगरपरिषदेच्या साठवण तलावामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संपूर्ण शहराला पुढील ४५ दिवस पुरेल इतका पुरेसा नाही. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन फलटण नगरपरिषदेने पाणी कपातीचा मोठा निर्णय घेतला असून शहरात गुरुवार, दिनांक १८ जून २०२६ पासून ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने प्रभागानुसार पाणीपुरवठ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, पेठ सोमवार संपूर्ण भाग, पेठ मंगळवार संपूर्ण भाग, पेठ महतपुरा आणि जिंती नाका संपूर्ण भाग या परिसरामध्ये दिनांक १८, २०, २२, २४, २६, २८ आणि ३० जून २०२६ रोजी पाणीपुरवठा केला जाईल. तर फलटण शहरातील उर्वरित संपूर्ण भागामध्ये दिनांक १९, २१, २३, २५, २७ आणि २९ जून २०२६ रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे. कालवा बंद असल्याने निर्माण झालेली ही टंचाई नैसर्गिक परिस्थितीमुळे ओढवली असल्याने, नागरिकांनी आपल्या भागाला पाणी येण्याच्या दिवशी ते अत्यंत काटकसरीने व जपून वापरावे, नळांना तोट्या बसवून घ्याव्यात आणि कुठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून पुढील दीड महिना सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य होईल, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.
