सहयोगी तत्त्वावर कारखाना देण्याच्या निर्णयात कोणताही भेदभाव नाही; ‘दत्त इंडिया’ कायदेशीर अटी पूर्ण करत असल्याचा चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचा दावा.
। लोकजागर वृत्त । फलटण । २५ जून २०२६ ।
“सहयोगी तत्त्वावर कारखाना चालवायला देताना तो सहकारी कारखान्याला द्यायचा की खासगी कारखान्याला, असा कुठलाही भेदभाव मूळ शासन निर्णयात नाही. शासन निर्णयातील सर्व आवश्यक अटी ‘दत्त इंडिया’ कंपनी पूर्ण करत असून, साखर आयुक्तांनीही या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी घेतलेली पत्रकार परिषद केवळ दिशाभूल करणारी आहे. उलट त्यांच्या याच राजकारणामुळे आज श्रीराम कारखाना बंद राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे कामगार आणि ऊस उत्पादकांना चांगलेच समजले आहे. म्हणूनच आता पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. एका सतरंजीवर बसू म्हणणाऱ्यांनी स्वतः कधी या कारखान्याला ऊस घातला आहे का?” असा थेट आणि रोखठोक सवाल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला. श्रीराम कारखान्याबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केवळ हा कारखाना अडचणीत कसा येईल आणि आपले हित कसे साधेल, एवढाच एक विचार विरोधक करत असून, त्यांच्या या भूमिकेमुळे फलटणची बाजारपेठ, कामगार आणि शेतकरी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, विरोधकांचे आमच्यावरचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच आपण तो ‘जवाहर’ कारखान्याला सहयोगी तत्त्वावर चालवायला दिला होता. त्यानंतर ‘दत्त इंडिया’ आणि ‘शरयू’ या कंपन्यांनीही कारखाना चालवण्याची तयारी दाखवली होती. अखेर सभासदांच्या संमतीने कारखाना ‘दत्त इंडिया’ला चालवायला देण्याचा निर्णय झाला. योग्य हातात व्यवस्थापन गेल्यास कारखाना चांगला चालेल आणि पर्यायाने सभासद, ऊस उत्पादक व कामगारांचा फायदा होईल, याच दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतला होता. आम्ही कारखान्याची निवडणूक घ्यायला देखील पूर्णपणे तयार होतो, मात्र माजी खासदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आणि आपल्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून ही निवडणूक पुढे ढकलली. त्यांना हा कारखाना काहीही करून बंद पाडायचा आहे, अशी टीका संजीवराजे यांनी केली. श्रीरामाच्या कृपेने हा कारखाना आजवर उत्तम रितीने सुरू राहिला असून सर्वांना या माध्यमातून न्याय मिळाला आहे. केवळ परवडत नाही म्हणूनच जवाहरने असमर्थता दाखवली, यामध्ये कोणत्याही आर्थिक देण्या-घेण्याचा आरोप करणे चुकीचे आहे, असेही संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखान्याची कायदेशीर बाजू मांडली. ते म्हणाले की, गळीत हंगाम सातत्याने तोट्यात जात असल्यामुळे करार मोडत असल्याचे अधिकृत पत्र जवाहर कारखान्याने व्यवस्थापनाला दिले होते. त्यानंतर कारखाना स्वतः चालवण्यासाठी आम्ही अनेक बँकांकडे कर्जाची मागणी केली, परंतु कर्ज उपलब्ध होत नसल्याने आपण स्वतः कारखाना चालवू शकत नाही, या अंतिम निर्णयावर संचालक मंडळ आले. हा संपूर्ण मुद्दा आम्ही माननीय उच्च न्यायालयात मांडल्यानंतर, न्यायालयाने हा कारखाना कायदेशीररी्या भाडेतत्त्वावर चालवायला देवू शकता असा निर्णय दिला. न्यायालयाच्या याच निर्णयानुसार आपण रीतसर विशेष सर्वसाधारण सभा घेऊन दत्त इंडिया कारखान्यासोबत पुढे जाण्याचा कायदेशीर निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही सर्व शासकीय नियम आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून हा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे दाखल केला होता. मात्र, नंतर ही प्रक्रिया मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राजकीय दबावापोटी थांबवण्यात आली.
या पत्रकार परिषदेला कारखान्याचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.
