अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व डिजिटल मीडिया परिषदेचे तहसीलदारांना निवेदन; खासदारांची ‘वाय’ सुरक्षा काढून घेण्याची आणि ‘बॉम्ब’ वक्तव्याची सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी.
। लोकजागर वृत्त । फलटण । ३० जून २०२६ ।
पत्रकारांविषयी अत्यंत बेताल आणि अर्वाच्य वक्तव्य करून थेट जीवे मारण्याची धमकी देणारे मुजोर खासदार संजय दिना पाटील यांचा फलटण येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या संदर्भात फलटणमधील पत्रकार बांधवांच्या वतीने एक अत्यंत कडक मागण्यांचे निवेदन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या वतीने नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी स्वीकारले. या निषेध प्रसंगी फलटणमधील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, अजय माळवे, यशवंत खलाटे, सुभाष भांबुरे, युवराज पवार, नासिर शिकलगार, पोपट मिन्ड, विनायक शिंदे, ॲड. रोहित अहिवळे, सुधीर अहिवळे, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, सचिन मोरे, विशाल शहा, मितेशकाका खराडे, अभिजित सरगर, दीपक मदने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, वैभव गावडे, प्रशांत रणवरे, संजय गायकवाड, वैभव जगताप, बाळासाहेब ननवरे, शेखर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार बांधवांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावर आणि कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांवर अशी दडपशाही करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये संजय दिना पाटील यांच्यासह अन्य पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची नेमकी राजकीय भूमिका आणि मत जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या पवित्र कर्तव्यापोटी काही पत्रकार त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, तेथे पत्रकारांनी काही अडचणीचे आणि वस्तुस्थितीला धरून प्रश्न विचारताच खासदार पाटील अचानक प्रचंड भडकले आणि त्यांनी पत्रकारांना थेट आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “परत जर माझ्या दारात आलात तर मारून टाकीन, माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा,” अशी अत्यंत अर्वाच्च, अरेरावीची आणि गुंडशाहीची भाषा त्यांनी वापरली, जी एका लोकप्रतिनिधीला अजिबात शोभणारी नाही.
या प्रकरणात विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, खासदार संजय दिना पाटील यांना शासनाकडून ‘वाय’ (Y) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोरच त्यांनी पत्रकारांना ही उघड धमकी दिल्याने हे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सरकारी सुरक्षेचा असा गैरवापर करणाऱ्या खासदारांची ही सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने त्वरित काढून घेतली पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वीही शिवसेनेला उद्देशून बोलताना संजय दिना पाटील यांनी, “माझ्याकडे बॉम्ब आहे, माझ्याकडे निदर्शने करायला कोणी आले तर मी थेट बॉम्ब टाकेन, तसेच मी यापूर्वी पाच खून केलेले आहेत,” अशी अत्यंत भयानक आणि बेजबाबदार मुक्ताफळे उधळली होती. देशाचा एक जबाबदार खासदार स्वतःकडे बॉम्ब असल्याची आणि खून केल्याची उघड धमकी देत असेल, तर ती संपूर्ण राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यांच्याकडे खरोखरच असे बेकायदेशीर बॉम्ब आहेत का आणि असल्यास ते कुठून आले, याची गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
