फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी
। लोकजागर वृत्त । फलटण । ३० जून २०२६ ।
फलटण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत वादळी आणि महत्त्वपूर्ण ठरली. या विशेष सभेमध्ये आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसह शहरातील विविध विकासकामांच्या एकूण २१ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या सभेत सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील उद्यानाचे नाव बदलण्याचा विषय चांगलाच चर्चेत राहिला. या उद्यानास सध्या ‘रामराजे उद्यान’ असे नाव असून त्याचे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ असे करण्याचा अधिकृत प्रस्ताव अशोक जाधव यांनी दिला होता. सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी प्रस्तावाचे वाचन करत सूचक म्हणून ही सूचना मांडली, तर किरण राऊत यांनी या प्रस्तावाला रीतसर अनुमोदन दिले. या चर्चेदरम्यान ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी या उद्यानाला फलटणचे माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. मात्र, यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत कौतुकास्पद आणि परिपक्व भूमिका घेतली. कै. हिंदुराव नाईक निंबाळकर हे स्वतः नगराध्यक्षांचे वडील असूनही, “खाजगी संस्थांना त्यांचे नाव आधीच दिलेले असल्याने शासकीय उद्यानाला संत सगुणामाता यांचेच नाव दिले पाहिजे आणि याला कोणाचा विरोध नसावा,” असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या वडिलांचे नाव कोणत्याही सार्वजनिक वास्तूला देणार नाही, असा एक अत्यंत मोठा आणि निस्पृह राजकीय आदर्श या निर्णयातून समाजासमोर ठेवला.
याच सभेत शहरातील झिरपे गल्लीतील नियोजित समाजमंदीराच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाचा गंभीर मुद्दा नगरसेवक पंकज पवार यांनी लावून धरला. यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. पुढील सभेपूर्वी शहरातील अतिक्रमण पूर्णपणे न हटवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट घरी बसण्याची वेळ येईल, असा कडक आणि थेट इशारा त्यांनी दिला. तसेच शहरातील मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. यावर, संबंधित खासगी भूखंड मालकांना तात्काळ नोटीस पाठवून त्यांनी स्वच्छता न केल्यास नगरपरिषद स्वतः स्वच्छता करेल आणि लागणारा संपूर्ण खर्च संबंधित मालकांच्या घरपट्टीत (करात) समाविष्ट करेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय नगराध्यक्षांनी दिला. दरम्यान, पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्याच्या विषयावरूनही सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला.
या विशेष सभेमध्ये आगामी आषाढी वारी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी दर्शन बारी उभारणे, हिरकणी कक्ष तयार करणे आणि विशेष स्वच्छतेच्या मोहिमेसह वारीशी संबंधित १९ महत्त्वाच्या कामांना तातडीने मंजुरी देण्यात आली. याशिवाय, फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य पुतळे उभारण्याच्या ऐतिहासिक प्रस्तावांनाही सर्वानुमते मान्यता देण्यात आली. अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान निवारा शेड उभारणे व कुरेशी नगरमधील विविध विकासकामे मंजूर करण्यात आली. शहरातील एकूण २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याची शासकीय प्रक्रियाही या सभेत मार्गी लागली. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील जुने हातपंप तातडीने दुरुस्त करणे, नवीन बोअरवेल मंजूर करणे आणि गोळीबार मैदान येथे तब्बल पाच लाख लिटर क्षमतेची भव्य पाण्याची टाकी बांधण्यास संमती देण्यात आली, तर काळूबाई नगर येथील पाण्याची टाकी तात्काळ कार्यान्वित करण्याचे कडक आदेशही यावेळी प्रशासनाला देण्यात आले.
