बारा वर्षे पूर्ण झाल्याची सरकारला जाणीव करून देण्यासाठी सकल धनगर समाज व मेंढपाळ आर्मी संघटनेचा पुढाकार.
। लोकजागर वृत्त । फलटण । ३० जुलै २०२६ ।
फलटण तालुक्यातील सकल धनगर समाज आणि मेंढपाळ आर्मी संघटनेच्या वतीने धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे आणि मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कायद्यात तरतूद करून त्यांना योग्य संरक्षण मिळावे, या मागणीसाठी फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांना निवेदन देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै २०१४ रोजी बारामतीमधील आंदोलनादरम्यान राज्यात सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक वर्षे उलटूनही हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने, या आश्वासनाला बारा वर्षे पूर्ण होत असल्याची आठवण करून देण्यासाठी हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
निवेदनाद्वारे धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा तसेच मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय मेंढपाळांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवून वन विभागाच्या जागेत चरण्यासाठी परवानगी द्यावी, असा आग्रहही धरण्यात आला आहे. या वेळी निवृत्ती खताळ, तानाजी जगताप, नितीन सुळ, कालिदास चोरमले, नानासो गोवेकर, आप्पा तात्या लोखंडे, प्रेम मोरे, हरी गोपनर, शंकर शिंगाडे, रमेश तांबे, किसनराव सोनवलकर, रत्नाकर क्षीरसागर, प्रमोद शिंदे, गणेश कुंभार, सुरेश झेंडे, शंभूराजे शेंडगे, महादेव शेळके, सुनील शिंदे, रोहिदास ठोंबरे, सचिन ठोंबरे, संतोष येळे, पोपट सुळ, बाबू तांबे, मुगटराव येळे, संतोष सुळ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
