कोल्हापूर येथे घेतली सांत्वनपर भेट; शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना.
। लोकजागर वृत्त । फलटण । १३ ऑगस्ट २०२६ ।
शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील एका दीपस्तंभाचा अस्त झाला असून सर्वत्र मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखाच्या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर येथे पोहोचून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि संजय पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी त्यांनी डी. वाय. पाटील यांच्या प्रदीर्घ व दैदिप्यमान वाटचालीच्या आठवणींना उजाळा देत पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांचे अत्यंत भावूक वातावरणात सांत्वन केले.

डी. वाय. पाटील यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक व सार्वजनिक जीवनातही दूरदृष्टीने अफाट कार्य उभे केले. त्यांनी लावलेल्या शैक्षणिक वृक्षाचा वटवृक्ष झाला असून, त्यांच्या कार्याचा गढद ठसा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उमटला आहे. त्यांच्या जाण्याने एक अत्यंत कर्तृत्ववान, दिलदार आणि समाजाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची तीव्र भावना या वेळी संजीवराजे यांनी व्यक्त केली.या सांत्वनपर भेटीदरम्यान पार्श्वनाथ राजवैद्य, हेमंत रानडे, प्राचार्य पी. एच. कदम यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
