नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञान उपयुक्त; बांदूळा वस्तीवर नवनाथ खोमणे यांच्या शेतात प्रात्यक्षिक.
। लोकजागर वृत्त । फलटण । १५ ऑगस्ट २०२६ ।
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत सासकल (ता. फलटण) येथील बांदूळा वस्तीवर शेतकऱ्यांना वृक्षलागवड, पक्षी थांबे तंत्रज्ञान आणि निसर्गपूरक पीक उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नवनाथ खोमणे यांच्या बाजरी पिकात पक्षी थांबे लावण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.
पिकांमध्ये पक्षी थांबे उभारल्यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होते. त्यामुळे पिकांवरील अळ्या व विविध किडींचे नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते. कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कीड नियंत्रण करून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे या वेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या डोंगर शेतावर वडाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “जय जवान, जय किसान” तसेच “पक्षी थांबा लावा, निसर्गातच अळीचे नियंत्रण करा” अशा घोषणा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश या वेळी देण्यात आला.
या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध मोहिमांची माहिती देत वृक्षलागवडीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “झाडे लावणे ही केवळ पर्यावरण संवर्धनाची बाब नसून पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. झाडांमुळे प्राणवायू मिळतो, प्रदूषण कमी होते, पावसाच्या चक्राला मदत होते, मातीची धूप रोखली जाते आणि पक्षी व वन्यजीवांना आसरा मिळतो.”
झाडांच्या मुळांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी टिकून राहण्यास हातभार लागतो. तसेच झाडांपासून फळे, फुले, लाकूड आणि विविध औषधी वनस्पती मिळतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर, माळरानावर तसेच उपलब्ध जागेत वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन सचिन जाधव यांनी केले. शेतकऱ्यांनी वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न ठेवता गावागावांत वृक्षलागवडीची चळवळ उभी केली पाहिजे. त्याचबरोबर पक्षी थांबे तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्गाच्या मदतीने पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
