राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या आदेशानुसार नियुक्ती; ‘कर्मवीरांचे स्वप्नातील विद्यापीठ’ अधिक सक्षम करण्याचा सुप्रिया सुळेंचा संकल्प.
। लोकजागर वृत्त । सातारा । २२ ऑगस्ट २०२६ ।
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या समूह विद्यापीठाच्या नूतन कुलाधिकारीपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी २२ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ असून, भारत सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सार्वजनिक विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यापीठाचे प्रथम कुलाधिकारी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांची नूतन कुलाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, सांविधिक अधिकारी व अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत चंद्रकांत दळवी यांनी आपल्या पदाचा कार्यभार नूतन कुलाधिकारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय, शैक्षणिक व विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. “रयत शिक्षण संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे, ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची मनोमन इच्छा होती. त्या स्वप्नानुसारच या विद्यापीठाची स्थापना झाली असून विद्यापीठ उच्च शिक्षणात उत्तम कामगिरी करत आहे,” असे मत चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांचे स्वागत करून अभिनंदन केले. नूतन कुलाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. सर्वसामान्य, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न हे विद्यापीठ पूर्ण करत आहे. त्यामुळे ‘कर्मवीरांच्या स्वप्नातील विद्यापीठ’ अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख करण्याची जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक ज्ञान, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
८,००० विद्यार्थी अन् २१ विषयांत पीएच.डी.:
हे एक नॉन-अफिलिएटिंग विद्यापीठ असून यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा ही विद्यापीठाची घटक महाविद्यालये आहेत. विद्यापीठामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांतील ८२ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून सुमारे ८,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच २१ विषयांत पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू असल्याची माहिती कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.
या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव बंडू पवार, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता अनिलकुमार वावरे, डी. डी. नामदास, आर. आर. साळुंखे, कुलसचिव विजय कुंभार, परीक्षा विभागाचे संचालक हेमंत उमाप, वित्त व लेखाधिकारी धनाजी जाधव, तसेच घटक महाविद्यालयांचे प्राचार्य साळुंखे, प्राचार्य राजेंद्र मोरे, उपकुलसचिव बिना निपाने, निर्मल पवार आणि जगन्नाथ काटकर आदी उपस्थित होते.
