२४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान फलटणकरांसाठी पर्वणी
। लोकजागर वृत्त । फलटण । २३ ऑक्टोबर २०२६ ।
श्री सद्गुरू प्रतिष्ठान फलटणच्या वतीने फलटणच्या सांस्कृतिक वैभवात प्रतिष्ठेचा शिरपेच असणाऱ्या ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य महोत्सव दिनांक २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फलटण येथील एस.टी. स्टँडसमोर असलेल्या श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नगरी (यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान) येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि श्री सद्गुरू प्रतिष्ठान व फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या महोत्सवात ऑटोमोबाईल्स, खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव, फनफेअर, गृहोपयोगी वस्तू आणि भव्य शॉपिंग महोत्सवाचा आनंद नागरिकांना घेता येणार असून, प्रदर्शनाची वेळ सकाळी ११:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत असणार आहे. महोत्सवानिमित्त विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात २४ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर ‘गाणी मनातली’ ऑर्केस्ट्रा, २५ ऑक्टोबर रोजी ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, २६ ऑक्टोबर रोजी लोकप्रिय ‘होम मिनिस्टर पैठणी शो’, २७ ऑक्टोबर रोजी आकर्षक ‘लावणी महोत्सव’ तर २८ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप होणार आहे. रोज सायंकाळी ६ वाजता हे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास व पाच दिवसांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, फलटण शुगर वर्क्स साखरवाडीचे माजी चेअरमन प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले, फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) आदी मान्यवर सन्माननीय उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब आणि सहपरिवार या महोत्सवाला उपस्थित राहून आनंद, चव आणि मनोरंजनाचा परिपूर्ण आस्वाद घ्यावा, अशी नम्र विनंती फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ आणि कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी केली आहे.
