शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचे काम फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार

श्री सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ चा दिमाखदार शुभारंभ; विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात पार पडले उद्घाटन.

। लोकजागर वृत्त । फलटण । २४ ऑक्टोबर २०२६ ।

शहराला जर सांस्कृतिक वारसा नसेल तर शहराच्या वाढीला संस्कृती राहत नाही, आणि सोसायटी कल्चर लुप्त पावत असताना शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचं काम या फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून दिलीपसिंह भोसले यांनी सुरू केलेलं आहे, असे गौरवोद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ चे उद्घाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या व्यासपीठावर आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटण फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, अमोल सस्ते, विक्रम भोसले, बजरंग गावडे, हेमंत बोरावके, उदयसिंह निंबाळकर आणि श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलीपसिंह भोसले हे सहकार, उद्योग, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात काम करणारे अष्टपैलू नेतृत्व असल्याचे सांगत भोसले कुटुंबातर्फे फलटण तालुक्याला सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गौरवाने नमूद केले. फलटण तालुक्यात मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण उरले नसून मागील काळातील राजकारणामुळे सार्वजनिक जागांवरील आरक्षणे उठवून तिथे काँक्रीटची जंगले उभी राहिली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र सध्या फलटण शहरासाठी नवीन सांस्कृतिक भवन मंजूर झाले असून रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत आहेत आणि नगराध्यक्ष व त्यांची टीम शहराच्या मूलभूत गरजांसाठी उत्तम काम करत आहे. शहराला परमनंट स्ट्रक्चर देऊन त्या माध्यमातून समृद्ध सांस्कृतिक वारसा उभा करण्याचे काम आपण नक्की करू, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार सचिन पाटील म्हणाले की, यंदा जरी दुष्काळाचे सावट असले तरी शहरातील नागरिकांना सणासुदीच्या काळात आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घेता आला पाहिजे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने व्यापारी वर्ग तसेच महिलांच्या गृहउद्योगांना हक्काचे व्यासपीठ व आर्थिक चालना मिळावी, हा या फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश असून दिलीपसिंह भोसले यांचा हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे.

फलटण फेस्टिव्हलचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या माध्यमातून फलटणकरांना एक उत्तम सांस्कृतिक पर्वणी उपलब्ध झाली आहे. पुढील चार दिवस या ठिकाणी दर्जेदार कार्यक्रम होणार असून सर्व फलटणकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत येऊन या फेस्टिव्हलचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नवनाथ कोलवडकर यांनी अत्यंत आकर्षक शैलीत पार पाडले. आभार प्रदर्शनादरम्यान फलटण फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विभागीय केंद्र फलटणला सुरू करण्यासाठी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने उपस्थित फलटणकर नागरिकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.

Spread the love