गतवर्षीच्या तुलनेत १०० टीएमसी साठा अधिक असला तरी प्रशासनाला काटकसरीचे निर्देश; ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश.
। लोकजागर । मुंबई । २२ एप्रिल २०२६ ।
राज्यातील विविध धरणांमध्ये सध्या सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा समाधानकारक असला तरी, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पाणीसाठ्याची सद्यस्थिती आणि तुलना: जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील धरणांमध्ये ६५३.६३ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ५५१.८६ टीएमसी इतका होता, म्हणजेच यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. मात्र, एल निनोच्या संकटामुळे २०१४ आणि २०१५ मध्ये पाणीसाठ्यात १२ ते १४ टक्क्यांनी घट होऊन मोठी टंचाई निर्माण झाली होती, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली. २०२५ मध्ये ऑक्टोबर महिन्यात १३३०.९७ टीएमसी साठा होता, जो आता ६५३ टीएमसीवर आला आहे.
प्रशासनाला काटेकोर नियोजनाचे निर्देश: राज्यातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील, याची खात्री करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काटकसरीच्या उपायोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता गृहीत धरून पुढील वर्षासाठी पुरेसा साठा शिल्लक ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.
विभागनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये): राज्यातील विविध महसूल विभागांतील पाणीसाठ्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
- पुणे विभाग (७२४ धरणे): २०६.५५ टीएमसी (गतवर्षी १७४.०४)
- छत्रपती संभाजीनगर (९२९ धरणे): १२९.३७ टीएमसी (गतवर्षी ९७.०९)
- नाशिक विभाग (५३९ धरणे): १०१.९६ टीएमसी (गतवर्षी ८९.२८)
- नागपूर विभाग (३८७ धरणे): ८०.७९ टीएमसी (गतवर्षी ६३.४०)
- अमरावती विभाग (२७६ धरणे): ७३.७२ टीएमसी (गतवर्षी ६५.१३)
- कोकण विभाग (१७३ धरणे): ६१.२४ टीएमसी (गतवर्षी ६२.९२)
प्रमुख धरणांतील स्थिती: राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये कोयना ३३.६२ टीएमसी, जायकवाडी ४२.०३ टीएमसी आणि उजनी १३.३९ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. याव्यतिरिक्त पेंच प्रकल्प (२६.५७), इसापूर (२१.४५), भातसा (१५.७०) आणि गोसीखुर्द (१४.३१) या धरणांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत असल्याने हा साठा जपून वापरणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
