। लोकजागर । सातारा । दि. २ जानेवारी २०२६ ।
ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये आज ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ अत्यंत दिमाखात झाला. ‘मी भाषाभिमानी… मी साहित्यप्रेमी’ अशा घोषणा, गगनभेदी ढोल-ताशांचा गजर आणि ३३ वर्षांनंतर साताऱ्यात परतलेल्या या सारस्वतांच्या मेळाव्याचा अपूर्व उत्साह, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. ऐतिहासिक राजवाड्यापासून सुरू झालेली ही शोभायात्रा शाहू मैदानावरील संमेलन स्थळापर्यंत पोहचली, तेव्हा सातारकरांनी रांगोळ्यांच्या सुंदर पायघड्या आणि पुष्पवृष्टी करत या अनोख्या शब्द-वारीचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले हजारो साहित्यप्रेमी आणि बालगोपाळांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अवघे शहर साहित्यमय होऊन गेले होते.
‘लीळाचरित्र’ ते ‘महासम्राट’; पालखीत विराली ग्रंथसंपदा
आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये मराठी साहित्यातील अनमोल मानबिंदू असलेले ग्रंथ विराजमान झाले होते. यामध्ये ‘लीळाचरित्र’, ‘श्री तुकाराम गाथा’, ‘सार्थ श्री ज्ञानेश्वरी’ आणि ‘भारताचे संविधान’ यांसारख्या मौलिक ग्रंथांसोबतच संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील लिखित ‘महासम्राट’ आणि मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ हे ग्रंथ पूजनासाठी ठेवण्यात आले होते. या पालखीचे प्रस्थान तुतारीच्या निनादात आणि मराठमोळ्या शाही पद्धतीने झाले. यावेळी नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अमेरिकास्थित लेखक श्रीनिवास ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्ररथ आणि लोककलांचा अभूतपूर्व अविष्कार
या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यातील ५५ शाळा व महाविद्यालयांनी साकारलेले वैविध्यपूर्ण चित्ररथ होते. या रथांच्या माध्यमातून संत परंपरा, समाजसुधारकांचे कार्य आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक व शैक्षणिक वैभवाचे दर्शन घडवण्यात आले. कुपर कॉर्पोरेशनने सादर केलेला ‘संमेलन संरक्षक’ रथ, ज्यामध्ये श्यामची आई, श्रीमंत योगी आणि पानिपत यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचे हलता देखावे होते, तो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या दिंडीत मान तालुक्यातील शिक्षकांनी सादर केलेले गजनृत्य, वासुदेव, झांज पथक आणि एनसीसीच्या पथकाने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले.
सामाजिक संदेश आणि साहित्य प्रेरणा ज्योत
साहित्याच्या या उत्सवात केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाचेही दर्शन घडले. ‘मिम फाउंडेशन’च्या वतीने राबवण्यात आलेले ‘शिवीमुक्त संवाद’ अभियान आणि वाचनाचा संदेश देणारे मौलिक फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापासून निघालेली ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ ही या संमेलनाचे मुख्य वैशिष्ट्य ठरली. संतांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी आणि विविध ऐतिहासिक पात्रांच्या रूपात अवतरलेली मुले सातारकरांसाठी ‘सेल्फी पॉईंट’ बनली होती.
प्रशासकीय नियोजन आणि सातारकरांचा प्रतिसाद
ग्रंथदिंडीच्या मार्गावर चौकाचौकात नागरिकांनी उभे राहून ग्रंथ पालखीचे स्वागत केले. स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे दत्तात्रय मोहिते, नंदकुमार सावंत आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे ही ग्रंथदिंडी अत्यंत यशस्वी झाली. या भव्य ग्रंथदिंडीने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उंची वाढवली असून, मराठी मनाचा मानबिंदू जपल्याची भावना सातारकरांनी व्यक्त केली आहे.
