फलटणच्या न्यायदानात ऐतिहासिक सुवर्णपर्व; उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन

। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२६ ।

फलटणच्या न्यायालयीन आणि प्रशासकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण नुकताच अनुभवायला मिळाला. फलटणकरांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला यश येऊन ‘वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालया’चा उद्घाटन सोहळा मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्यामुळे फलटणच्या न्यायप्रवासाला नवे बळ मिळाले असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित मानले जात आहे. या कार्यक्रमास नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात फलटण वकील संघाचे अध्यक्ष एन. एम. जाधव यांनी पक्षकार आणि वकिलांच्या संघर्षाची भावनिक कहाणी मांडली. फलटण ते सातारा हे ८० किलोमीटरचे अंतर पार करताना होणारा वेळ, पैसा आणि मानसिक त्रासातून आता फलटणकरांची कायमची मुक्तता झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, फलटणमधील सर्व न्यायालये एकाच इमारतीत असावीत आणि येथे धर्मादाय व सहकार न्यायालयही सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्हा निर्मितीचे स्वप्न अधोरेखित केले. जिल्हा प्रमुख न्यायाधीश वाघमारे यांनी यावेळी माहिती दिली की, न्यायालय मंजूर होताच अवघ्या दोन दिवसांत २०४५ प्रकरणे साताऱ्यावरून फलटणला वर्ग करण्याची मोठी प्रशासकीय कामगिरी करण्यात आली असून, आता ई-सुविधा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामकाज गतिमान होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी यावेळी “कोर्ट सॅल्युटसाठी नसून न्यायासाठी असते” असे ठणकावून सांगत, न्यायदानात होणारा उशीर हा व्यवस्थेवरील डाग असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील शेतकरी हा अन्नदाता असून त्याला वेळेत न्याय देणे ही पवित्र जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी वकिलांना पक्षकारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले, तर न्यायमूर्ती ए. एन. पानसरे यांनी “आमची माती, आमची माणसं” असे म्हणत आपले फलटणशी असलेले जुने नाते व्यक्त केले. त्यांनी सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.

उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालय लांब असणे हे न्यायदानासाठी अडथळा ठरते, मात्र आता फलटणमध्ये न्यायालयांची साखळी पूर्ण झाली आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्यायाधीश आणि वकील या दोघांनीही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. फलटणचे पहिले दिवाणी न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी शेवटी सर्वांचे आभार मानत, जनतेच्या सेवेसाठी आणि जलद न्यायदानासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या सोहळ्यामुळे फलटणकरांना न्यायाचा दरवाजा आता आपल्या शहरातच उघडला असून, संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

Spread the love