। लोकजागर । फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।
“जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाई, भिमाई, बहिणाई, जनाई, ताराई आणि सिंधूताई यांसारख्या महामातांच्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाचा वैभवशाली वारसा आज जगभर पसरला आहे. सरपंच ते राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी मारलेली झेप ही त्यांच्या सबळ असण्याचे प्रतीक आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आजच्या महिला अबला नसून खऱ्या अर्थाने क्रांतीकारक सबला आहेत,” असे गौरवउद्गार ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.
शिवकृपा सहकारी पतपेढी, फलटण यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “शिवशक्ती हीच नारी शक्ती” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुली अधिकारी शंकर शिंदे उपस्थित होते.
महिलांच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि संस्कारांचे महत्त्व: आपल्या मार्गदर्शनात प्रा. कोकरे पुढे म्हणाले की, “ज्याच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी” या उक्तीप्रमाणे आजच्या महिलांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. संततीवर संस्कार, कौटुंबिक जिव्हाळा आणि नात्यांची जपणूक करताना त्यांना आर्थिक समतोल साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. “रडते ती महिला नव्हे, तर लढते ती रणरागिणी होय,” असे सांगतानाच त्यांनी महिलांनीच महिलांना समान दर्जा द्यावा आणि मुलींच्या जन्माचे उत्साहात स्वागत करावे, असे आवाहनही केले.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान: या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ. मीना नेवसे, संध्या शिंदे, सुनिता सोनवलकर, शालिनी कदम, पूनम माने, डॉ. अर्चना यादव, रूपाली जाधव आणि छाया पखाले यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाधिकारी कृष्णा कदम यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार मयूर जगताप यांनी केला, तर सूत्रसंचालन प्रतिभा हाके व भाग्यश्री मुळीक यांनी केले. शेवटी कोमल तांबे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला फलटण परिसरातील विविध क्षेत्रांतील महिला आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
