माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांचे गोखळीत प्रतिपादन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाचनालयाला १३५ ग्रंथ भेट.
। लोकजागर । फलटण । २१ एप्रिल २०२६ ।
जीवनाच्या प्रत्येक वळणावर माणूस नव्याने काहीतरी शिकत असतो आणि हे शिकणेच त्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर पुस्तके आणि माणसे वाचायला शिकले पाहिजे. पुस्तके जगण्याची दिशा देतात, तर माणसे जगायला शिकवतात. वाचनामुळे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही, असे प्रतिपादन माणदेशी साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे यांनी केले.
गोखळी (ता. फलटण) येथे शहीद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘१३५ ग्रंथ भेट’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ. ऋतुजा जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताराचंद्र आवळे यांनी आपल्या भाषणात पालकांना मुलांच्या संस्कारांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “मुले हीच आपली खरी संपत्ती आहे. मोबाईलमधील ‘रील्स’मुळे मानवी आयुष्य क्षणभंगुर होत चालले आहे. आधुनिकतेचा बुरखा ओढलेल्या या पिढीने मोबाईल बाजूला ठेवून जर हातात पुस्तके घेतली, तरच भावी पिढीला योग्य प्रेरणा मिळेल. प्रत्येक घरात वाचनाची गोडी लागली, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. आपली मुले कोणाची शिकार होणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी.” आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता कुटुंब जपणे आणि जीवनाला योग्य आकार देणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आबा मदने यांनीही वाचनाचे महत्त्व विषद केले. शाहीर प्रमोद जगताप आणि सतीश झेंडे यांनी समाजप्रबोधनपर कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून आवळे सरांनी वाचनालयाला कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा १३५ पुस्तकांचा संच भेट दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश भागवत यांनी केले, तर सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले. या सोहळ्याला माजी सरपंच रमेश गावडे, अमोल हरिहर, बबलू शिरतोडे, मयूर गावडे, श्रीकांत माने यांच्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयाला मिळालेल्या या ग्रंथभेटीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
