कांबळेश्वर शाळेला दर्जेदार साहित्यकृतीचा संच भेट; उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांची काळजी घेण्याचे चिमुकल्यांना आवाहन.
। लोकजागर । बारामती । १८ एप्रिल २०२६ ।
लहानपणीचा काळ हा सुखाचा, संस्काराचा, आनंदाचा आणि जीवन घडवण्याचा असतो. या जडणघडणीत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण म्हणजे खऱ्या अर्थाने अस्सल बावनकशी सोनं आहे. मुलांच्या मनामध्ये मूल्यांची पेरणी करणारी जिल्हा परिषद शाळा हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहे, असे गौरवउद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी काढले. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे ‘आनंददायी शिक्षण’ या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या दर्जेदार साहित्यकृतींचा एक संच शाळेच्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिला.
शिक्षणाच्या प्रक्रियेवर भाष्य करताना प्रा. कोकरे म्हणाले की, हसत-खेळत आणि हुंदडत शिक्षण देणे हीच जिल्हा परिषद शाळेची मोठी कामगिरी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणे ही गुरुजींची नैतिक जबाबदारी आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण करणे, खेळ, व्यायाम, परिसर स्वच्छता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे आवश्यक आहे. तसेच वाढदिवस साजरा करताना केकऐवजी फळे कापून तो साजरा करावा आणि लहानपणापासूनच थोरामोठ्यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे संस्कार जोपासावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उन्हाळ्याच्या तीव्रतेचा विचार करून प्रा. कोकरे यांनी विद्यार्थ्यांना पशू-पक्ष्यांची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन केले. लहान मुलांना समजेल अशा अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत त्यांनी व्याख्यान दिल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांच्या या संवादामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जयवंत कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेवणनाथ सर्जे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी ज्ञानदेव सस्ते, निर्मला खताळ मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी अंगणवाडी व बालवाडी सेविका, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांबळेश्वर शाळेने राबविलेल्या या प्रबोधनात्मक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
