ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या शैक्षणिक कार्यासाठी दिलीपसिंह भोसले यांच्याकडून ११,१११ रुपयांची मदत जाहीर

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव.

। लोकजागर । फलटण । २३ एप्रिल २०२६ ।

रविंद्र बेडकिहाळ हे गेल्या ५८ हून अधिक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत आहेत. फलटण शहरात महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक कार्यही अविरत सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शैक्षणिक कार्याला बळकटी देण्यासाठी मी ११ हजार १११ रुपयांची मदत जाहीर करतो, असे प्रतिपादन श्री सदगुरु व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी केले.

येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रविंद्र बेडकिहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन बेडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी रवींद्र बर्गे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधी सौ. अलका बेडकिहाळ, चतुराबाई शिंदे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी दिलीपसिंह भोसले पुढे म्हणाले की, बेडकिहाळ सरांचे आम्हाला सामाजिक कार्यात नेहमीच मार्गदर्शन लाभते. कोणताही भेदभाव न करता ते समाजात योगदान देत असतात. आता माझ्या स्नूषा सौ. प्रियदर्शनी या नगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या आणि माझ्या संस्था समूहाच्या माध्यमातून या शैक्षणिक संकुलास सर्वतोपरी मदत केली जाईल.

प्रेरणादायी उत्साह आणि सामाजिक ऋणानुबंध: डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रविंद्र बेडकिहाळ यांच्या कल्पनेतून फलटण शहरात विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवता येतात. स्व. सुभाषकाका सूर्यवंशी-बेडके यांच्याशी असलेले त्यांचे ऋणानुबंध आम्ही आजही जपत आहोत. या वयातही त्यांचा उत्साह आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध उपक्रमांचा शुभारंभ व सत्कार: या सोहळ्याचे औचित्य साधून ’समर्थ कोचिंग क्लासेस’च्या अ‍ॅकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल सौ. अलका बेडकिहाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव: वाढदिवसानिमित्त रविंद्र बेडकिहाळ यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी, फलटणसह विविध जिल्ह्यांतील पत्रकार व पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

Spread the love