। लोकजागर । मुंबई । २७ एप्रिल २०२६ ।
राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी बस स्थानकांवरील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आता प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटाच्या दराव्यतिरिक्त जादा २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (Cleaning Surcharge) म्हणून आकारले जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांना शासनाकडून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे, अशा लाभार्थ्यांनाही आता या २ रुपयांच्या शुल्कातून सूट मिळणार नाही. त्यांनाही हा अधिभार भरावाच लागणार आहे.
काय आहे हा नवा नियम? एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार, तुम्ही कितीही अंतराचा प्रवास केला तरी प्रत्येक तिकिटामागे २ रुपये अतिरिक्त आकारले जातील. या बदल्यात राज्यातील कोणत्याही एसटी बस स्थानकावरील प्रसाधनगृहांचा वापर प्रवाशांना मोफत करता येईल. यापूर्वी प्रसाधनगृहे वापरण्यासाठी प्रवाशांना ५ ते १० रुपये द्यावे लागत होते. मात्र, आता हा खर्च थेट तिकिटातच समाविष्ट करण्यात आला आहे.
मोफत प्रवास करणाऱ्यांनाही द्यावा लागणार अधिभार: शासनाच्या विविध योजनांतर्गत ज्यांना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा आहे, त्या लाभार्थ्यांनी शून्य दराचे तिकीट काढताना आता २ रुपये रोख देणे अनिवार्य झाले आहे. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे:
- ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक: ज्यांना साध्या व निमआराम बसेसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास दिला जातो.
- स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार: वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा असलेले स्वातंत्र्य सैनिक.
- दिव्यांग व्यक्ती: पात्र दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग इ.) व्यक्तींनाही हा २ रुपयांचा चार्ज द्यावा लागेल.
- समाजभूषण पुरस्कार प्राप्त: डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार.
- शालेय मुली (ग्रामीण): अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास असलेल्या ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी मधील विद्यार्थिनी.
- पत्रकार: शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही ठराविक मर्यादेपर्यंतच्या मोफत प्रवासासाठी हा अधिभार भरावा लागेल.
- सेवानिवृत्त कर्मचारी: एसटीचे निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नी/पतीलाही प्रवासादरम्यान हा जादा दर द्यावा लागेल.
महामंडळाच्या तिजोरीत होणार कोटींची भर: राज्यात दररोज सरासरी ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. या २ रुपयांच्या अधिभारातून महामंडळाला दररोज अंदाजे १ कोटी १० लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. हा निधी प्रामुख्याने बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांची निगा, पाणपोईची व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या रेस्टरूममधील सुविधा सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे.
या निर्णयामुळे एकीकडे स्थानकांवरील स्वच्छतेचा दर्जा सुधारेल, अशी आशा असली तरी दुसरीकडे सवलतीचे लाभार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. “मोफत प्रवास असतानाही रोख पैसे देण्याची सक्ती का?” असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
