। लोकजागर । फलटण । ११ जून २०२६ ।
आषाढी वारीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पुढील महिन्यात फलटण नगरीत दाखल होत आहे. संपूर्ण फलटणकर माउलींच्या आणि लाखो वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी उत्सुक असतानाच, शहरातील मुख्य पालखी तळ (विमानतळ परिसर) आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची झालेली प्रचंड दुरवस्था आता चिंतेचा विषय बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पालखी तळावरील कचऱ्याचे साम्राज्य आणि पसरलेली दुर्गंधी पावसाळ्यापूर्वी व सोहळ्यापूर्वी तातडीने स्वच्छ करावी, अशी मागणी फलटण शहरवासीय व माउली भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे.
सध्या फलटण विमानतळ आणि पालखी तळाच्या चौहू बाजूंना कचऱ्याचे ढीग साचले असून, मुख्य रस्त्याच्या कडेलाच तात्पुरता कचरा डेपो तयार झाल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी या जागेची पाहणी करण्यासाठी दौरे करत असतात, मात्र तरीही येथील प्लास्टिकच्या पिशव्या आणि वर्षानुवर्षांचा जुना साचलेला कचरा अद्याप पूर्णपणे का हटवला गेला नाही, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत श्रद्धेने येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांसमोर स्वच्छ व सुंदर फलटणचे नाव मलिन होऊ नये, हीच यामागील नागरिकांची मुख्य भावना आहे.
नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीची गरज:
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्थानिक रहिवाशांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. पालखी तळाच्या आसपास राहणाऱ्या ज्या नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो, त्यांच्यावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी आणि सर्वांना नियमितपणे घंटागाडीतच कचरा टाकण्याची सवय लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, ज्या उपनगरांमध्ये नियमित घंटागाडी आणि कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्था नसेल, तेथे प्रशासनाने याबाबतच्या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी फलटणकरांमधून होत आहे.
