लोकजागर । फलटण । १२ जून २०२६ ।
यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे फलटण तालुक्यात उन्हाळ्याच्या उत्तरार्धात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा जटील बनला आहे. कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील पारंपरिक जलस्रोत पूर्णपणे आटले असून, महसूल विभागाने तालुक्यातील तब्बल ५१ गावांमध्ये अधिकृतपणे टंचाई सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या भीषण टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, सध्या तालुक्यातील ५ गावे आणि २७ वाड्यावस्त्या अशा एकूण ३२ ठिकाणी शासकीय व खाजगी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची महत्त्वाची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
तालुक्यात फेब्रुवारी, मार्च आणि जून या महिन्यांत टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करून संकटग्रस्त ५१ गावांची टंचाई निवारण यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदा केवळ मानवी पिण्याच्या पाण्याचाच नव्हे, तर ग्रामीण भागात पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहण्याची चिन्हे आहेत. सद्यस्थितीला दुधेबावी व त्याअंतर्गत असणाऱ्या ११ वाड्यावस्त्या, सासवड व ५ वाड्यावस्त्या, मानेवाडी व ६ वाड्यावस्त्या तसेच मिरढे व त्यासोबतच्या ७ वाड्यावस्त्यांवर प्रशासकीय टँकर धावत आहेत. याव्यतिरिक्त वेळोशी आणि आसपासच्या दुर्गम डोंगरपट्ट्यातील रहिवाशांनाही पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागत आहे. अल निनोच्या (Al Nino) जागतिक प्रभावामुळे यंदा पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवल्याने महसूल व विहीर अधिग्रहण प्रशासनाची चिंता वाढली आहे.
बागायती पट्ट्यातही झळा; ‘या’ ४ गावांत विहीर अधिग्रहण: चिंतेची बाब म्हणजे नेहमी पाण्याचा सुकाळ असणाऱ्या तालुक्यातील बागायती पट्ट्यातील काही गावांचाही या टंचाईग्रस्त यादीत समावेश झाला आहे. जर पावसाने आणखी काही दिवस दडी मारली, तर टंचाईची तीव्रता अधिक वाढून नवीन गावांची मागणी वाढू शकते, असे संकेत मिळाले आहेत. पाणीटंचाई तीव्र झालेल्या गावांमध्ये पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून प्रशासनाने पीराचीवाडी, खामगाव, जिंती आणि ताथवडा या ४ गावांमध्ये खाजगी विहिरींचे कायदेशीर अधिग्रहण केले आहे. “नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत स्वच्छ पिण्याचे पाणी सुरळीत मिळावे यासाठी महसूल यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे,” असे सांगत तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांना पाण्याचा थेंब अन् थेंब काटकसरीने वापरण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
फलटण तालुक्यातील अधिकृत ५१ टंचाईग्रस्त गावे पुढीलप्रमाणे:
धुळदेव, झिरपवाडी, सोनवडी बु., सोनगाव, माळेवाडी, शिंदेमळा, आंदरूड, नांदल, ढवळेवाडी, आसू, टाकळवाडे, मानेवाडी, मिरगाव, दर्याचीवाडी, मिऱ्याचीवाडी, दालवडी, कोळाळे, कापडगाव, पवारवाडी, ताथवडा, चौधरवाडी, फरांदवाडी, बिबी, वाघोशी, पिराचीवाडी, जिंती, आळजापूर, आदर्की बु., मलवडी, ठाकूरकी, हणमंतवाडी, मठाचीवाडी, होळ, खामगाव, ढवळ, झडकबाईचीवाडी, जावली, कापशी, टाकुबाईचीवाडी, मिरढे, सरडे, आदर्की खुर्द, हिंगणगाव, गोळेगाव पुरता, जाधवनगर, तांबवे, वडगाव, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, वडले आणि दुधेबावी.
