। लोकजागर वृत्त । फलटण । ३० जुलै २०२६ ।
‘‘आपल्या ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते. यातूनच व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते आणि जीवनातील ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात एखाद्या आदर्श व्यक्तीचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करावी’’, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटी आणि लोकजागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम विद्याभवन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय आणि चतुरबाई शिंदे बालक मंदिर मधील गुरुजनांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. अभिजीत जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व सचिव रविंद्र बेडकिहाळ होते.
यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक लायन महेश गरवालिया, संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्ष्या सौ. अलका बेडकिहाळ, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक), अरूण खरात (माध्यमिक) सुरेखा सोनवले (बालक मंदिर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘‘विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आदर्श पिढी किंबहुना समाज घडविण्याचे कार्य करणारी ही शाळा समाजासाठी प्रेरणादायी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले या शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे’’, असे गौरवोद्गारही डॉ अभिजीत जाधव यांनी काढले.
‘‘गुरू हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारे आणि जीवनमूल्यांची जपणूक करणारे असतात. शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिकण्याची जिद्द, परिश्रमाची तयारी आणि गुरूंबद्दल आदर कायम ठेवून जीवनात प्रगती साधावी’’, असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन संस्था आणि तिन्ही शाखांच्या कार्याचा सविस्तर आढावा रविंद्र बेडकिहाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतला.
‘‘शिकण्याची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली तर यश निश्चित मिळते. गुरूंच्या ऋणाची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे’’, असे मत शांताराम आवटे यांनी व्यक्त केले. महेश गरवालिया यांनीही यावेळी, ‘‘संस्थेच्या उर्वरित योजनेसाठी मी व आमचा मित्र परिवार निश्चितपणे पुढाकार घेईन’’, असे सांगितले.
प्रारंभी सरस्वती पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरूजनांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.भारती विदयापीठाच्या इंग्रजी परीक्षेत इयत्ता सहावीतील अनया पवार हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल तिचा सत्कार करण्यात आला.तसेच अकॅडमीचे प्रमुख राकेश कुलकर्णी आणि निकिता कुलकर्णी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
मनीष निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. अरूण खरात यांनी आभार मानले.
दिपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
