फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक; तातडीने दुरुस्तीसाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन!

गौरी-गणपती सणापूर्वी रस्ते नव्याने तयार करण्याची मागणी; पालखी रस्त्यावरील पाईपलाईन गळती रोखण्याचेही आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । १० ऑगस्ट २०२६ ।

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे आणि चर यांमुळे वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे व मणक्याचे विकार जडले असून, काही ठिकाणी गंभीर अपघातही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत व तातडीने दुरुस्ती करणेबाबत फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी (बेडके) यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

यावेळी फलटण नगर परिषदेचे नगरसेवक पंकज पवार, फलटण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अल्ताफ पठाण, मनोहर गायकवाड, लक्ष्मण तात्या शिंदे, मंजेखान मेटकरी व गंगाराम रणदिवे उपस्थित होते.

येत्या काही दिवसांत गौरी-गणपतीचा मोठा सण येत असून शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती आगमन, विसर्जन मिरवणुका तसेच घरगुती गणपती याच प्रमुख रस्त्यांवरून नेले जातात. खराब रस्त्यांमुळे सणासुदीच्या काळात रहदारीची कोंडी होण्याची आणि अपघात घडण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते तातडीने नव्याने तयार करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केलेले दुरुस्तीचे प्रमुख रस्ते:
१) भगवान महावीर स्तंभ ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक ते महात्मा गांधी चौक ते तेली गल्ली ते चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते नेहरू पुतळा (बारस्कर गल्ली)
२) शंकर मार्केट ते शुक्रवार तालीम गणपती मंदिर
३) निर्मलादेवी प्रा. विद्यामंदिर ते उपळेकर महाराज मंदिर
४) ॲड. नरेंद्र कृष्णचंद्र भोईटे घर ते ॲड. एन. एम. यादव घर
५) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाचबत्ती चौक
६) आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक ते रथखाना

तसेच फलटण शहरात पालखी रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम चालू असून यामध्ये काही ठिकाणी, उदाहरणार्थ गिरवी नाका चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानांच्या समोर तसेच पृथ्वी चौका जवळ, रस्त्याखालील पाईपलाईन लिकेज असतानाही त्यावर कॉंक्रीटीकरणाचे काम केल्यामुळे रस्त्यावर पाणी येत आहे. याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारास योग्य त्या सूचना देऊन लिकेजचे काम पूर्ण करण्यास सांगावे, अशी विनंती करण्यात आली आहे. सार्वजनिक हित आणि आगामी सण लक्षात घेता प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करून हे रस्ते युद्धपातळीवर नव्याने तयार करावेत, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.

Spread the love