पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व शिवसेना शाखा उद्घाटन; फलटणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही – शंभूराज देसाई.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ ऑगस्ट २०२६ ।
“आता मला मुंबईत नाही तुमच्यात राहू द्या; संजीवराजेंना मुंबई गाठू द्या. वरिष्ठ नेत्यांना जेव्हा कळतं की यांची जनतेत ताकद आहे, तेव्हा वरून राजकीय ताकद मिळते. आपली ताकद दाखवा; संजीवराजेंना पाहिजे ते मिळेल,” असे ठाम आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
तांबवे (ता. फलटण) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व शिवसेना शाखा उद्घाटन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले. त्या नंतर झालेल्या जाहीर सभेत रामराजे बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे शिवसेना सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना रामराजे पुढे म्हणाले, “जिल्ह्याची संस्कृती संपवायचा प्रयत्न चालला आहे. मी कमिन्स आणली तिला कुलूप लावायचा प्रयत्न त्यांनी केला, मी साखरवाडीचा कारखाना सुरू केला तो बंद पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मी श्रीराम वाचवला तोही त्यांना बंद पाडायचा आहे. साखरवाडी आणि श्रीराम बंद पाडून त्यांचा कारखाना चालवायचा असे त्यांचे षडयंत्र आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ८० टक्के विकासकामांचा पाया मी घातला आणि कळस दाखवायला आता ते आलेत. बुलेट ट्रेन, विमानतळ अशा स्वप्नात ते राहिलेत, त्यांना स्वप्नातच राहू द्या. त्यांचा फुगा मी फोडणार. ३० वर्षे कष्ट करून तालुका व्यवस्थित केला होता, तो मी माझ्या डोळ्यादेखत नष्ट होऊ देणार नाही.” या वेळी त्यांनी पालकमंत्र्यांनी महिन्यातून एकदा लोकप्रतिनिधींना साताऱ्यात वेळ द्यावा, अशी मागणीही केली.
सभेला संबोधित करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “सातारा जिल्ह्याच्या राजकारणासंदर्भात चर्चा होते, तेव्हा एकनाथ शिंदे मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्यासोबत काम करणारे रामराजे आणि संजीवराजे हे नेते आहेत, असे सांगतात. त्यांच्या विकासकामाच्या शब्दाला कुठलीही अडचण येऊ देऊ नका, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. जय-पराजय होत असतो; पण ज्या लोकांनी आपल्याला मते दिली आहेत, त्यांची कामे करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे फलटण शहरातील विकासकामांचेही प्रस्ताव द्या; ते आपण एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून पूर्ण करु. फलटण विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही.” तसेच शिवसैनिकांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही, अडचण आल्यास मी ठामपणे पाठीशी उभा राहीन, असे सांगत रामराजे आणि संजीवराजे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जाळे विणण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचण्यामागे कै. मनोहर जोशी, रामराजे व त्यांच्या नेतृत्वात असलेले आमदार आहेत. राजकीय अस्थिर परिस्थितीत आज आपल्याला शिवसेनेने तारले आहे. तुम्ही शिवसैनिक आहात; तुम्ही कोणाच्या वाटेला जाऊ नका, पण जर कोणी वाटेला लागला तर पाया मागे सरकवायला मागे-पुढे पाहू नका.”
माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत तालुक्याच्या वाड्या-वस्त्यांवर विकास आम्ही पोहोचवला; पण त्याची जाहिरात करायला आम्ही कमी पडलो. आमच्या कार्यकाळातील कामांचे नारळ आज दुसरे फोडत आहेत. ही वाईट प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी शंभूराज देसाईंनी ताकद द्यावी.” या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनीही मनोगत व्यक्त केले.
