फलटण परिसरातील टोल प्लाझांवर स्थानिक वाहनांना ६० किमी परिघासाठी वार्षिक सवलतीचा पास द्या; कांचनकन्होजा खरात यांची मागणी

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।

फलटण एस.टी. स्टँडपासून ६० किलोमीटर परिघातील सर्व टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील सर्व वाहनांना विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करण्याबाबतची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सातारा जिल्ह्यातील भौगोलिक, व्यापारी, कृषी, औद्योगिक व वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या फलटण शहरातून विविध दिशांनी जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांचे जाळे विकसित होत आहे. यामध्ये फलटण ते पंढरपूर, फलटण ते पुणे व जेजुरी, फलटण ते इंदापूर, बारामती व काटेवाडी, फलटण ते दहिवडी आणि फलटण ते लोणंद व शिरवळ अशा विविध मार्गांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यांच्या विकासाचा फायदा संपूर्ण सातारा जिल्हा, राज्य आणि देशाला होत असला तरी, पायाभूत सुविधा निर्माण करताना रस्त्यांच्या बांधकामाच्या काळात स्थानिक नागरिकांना अनेक वर्षे धूळ, वाहतूक कोंडी, अपघात, आर्थिक नुकसान व आरोग्याच्या विविध समस्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

आज हे रस्ते पूर्णत्वाकडे जात असताना स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ मिळण्याऐवजी प्रत्येक प्रवासात अतिरिक्त टोलचा आर्थिक भार सोसावा लागत आहे. सध्याच्या नियमानुसार टोल प्लाझापासून २० किलोमीटर अंतरातील वाहनांसाठी स्वतंत्र पासाची तरतूद असली तरी, फलटणसारख्या विस्तृत तालुक्यासाठी ही मर्यादा अपुरी ठरत आहे. त्यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून फलटण एस.टी. स्टँड मध्यबिंदू मानून ६० किलोमीटर परिघातील सर्व विद्यमान व भविष्यातील टोल प्लाझांसाठी ‘फलटण तालुका स्थानिक वार्षिक एकत्रित टोल पास’ सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा पास ट्रान्सपोर्ट व नॉन-ट्रान्सपोर्ट अशा सर्व पात्र वाहनांना बिनाभेदभाव लागू करावा आणि त्याची वार्षिक फी ५०० ते ६०० रुपयांपेक्षा जास्त नसावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच खासदार व आमदारांनी येत्या लोकसभा व विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडून तालुक्याला दिलासा द्यावा, असे आवाहनही कांचनकन्होजा खरात यांनी केले आहे.

Spread the love