नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची ग्वाही; मलठण येथे भीमज्योत जागृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध मान्यवरांचा गौरव.
। लोकजागर । फलटण । १७ एप्रिल २०२६ ।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, आगामी काळात विद्यार्थ्यांची कमिटी तयार करून त्यांना हवी असणारी सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. शहरात अशीच अद्ययावत वाचनालये निर्माण केली जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी दिली. मलठण येथील भीमज्योत जागृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक किरण राऊत आणि युवा नेते प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी महतपुरा पेठेच्या योगदानाचा गौरव केला. या पेठेने शहराला नगराध्यक्ष दिला असून, या परिसराच्या विकासावर आपली कायम नजर राहील, असे त्यांनी नमूद केले. तसेच या मंडळाच्या सामाजिक उपक्रमांना नगरपरिषदेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये निवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, ग्रंथमित्र आबासाहेब यादव आणि महाराष्ट्र पोलीस दलातील मयुरी चव्हाण यांचा समावेश होता. सन्मानित मान्यवरांच्या मानपत्राचे वाचन सुरुची बडेकर व श्रावस्ती अहिवळे यांनी केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते ॲड. आकाश आढाव यांनी आपल्या प्रबोधनात्मक भाषणातून महापुरुषांच्या संघर्षाची गाथा मांडली. जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी पंचशील आणि विपश्यना विद्या कशा प्रकारे महत्त्वाची ठरते, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. तसेच आपल्या स्वरचित कवितांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमात अंतरा बल्लाळ व दिक्षा कांबळे यांची छोटेखानी भाषणे झाली, तर तनिष्का गायकवाड हिने भीमगीत सादर करून वातावरण चैतन्यमय केले.
या सोहळ्यास आनंदराव कदम, डॉ. प्रभाकर भोसले, कृष्णाप्पा बनसोडे, महादेव गवळी, विठ्ठल मोरे, दादासाहेब गायकवाड, माणिक भोसले, मनिषा जगताप, शांताबाई वाघमारे, रेखा अहिवळे आणि लेखिका प्रतिक्षा आढाव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. दत्तात्रय कांबळे, किरण गायकवाड, प्रशांत कांबळे, संजय बडेकर, अशोक रणदिवे, अनिल बल्लाळ, निलेश गायकवाड, आर्यन बडेकर आणि विकी आढाव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अहिवळे सर यांनी केले, तर आभार संग्राम बल्लाळ यांनी मानले.
