फलटण-दहिवडी रस्त्याचे काम युद्धपातळीवर; खडकहिरा व कोळकी पुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा विळखा

। लोकजागर । फलटण । दि. १३ फेब्रुवारी २०२६ ।

फलटण ते दहिवडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि सक्षमीकरणाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून, शहराच्या हद्दीवरील खडकहिरा व कोळकी येथील बुवासाहेब मंदिराजवळील ओढ्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. विकासाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे असले तरी, या बांधकामाचा मोठा फटका सध्या फलटणकर आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या रूपाने सहन करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने शेजारीच एक तात्पुरता पूल उभारला आहे. मात्र, ओढ्यात मोठे पाईप टाकून तयार करण्यात आलेला हा पर्यायी मार्ग अत्यंत अरुंद असल्याने, येथून एकावेळी मर्यादित वाहनेच ये-जा करू शकतात. परिणामी, सकाळी शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत आणि सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांमुळे या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

या वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नसून, जुन्या गर्ल्स हॉस्टेल परिसरातील फलटण आरटीओ ऑफिस भागात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अरुंद रस्ता, बांधकामामुळे हवेत उडणारे धुळीचे प्रचंड लोट आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे या परिसरात वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, या भागात दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक नियंत्रक किंवा पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करणे गरजेचे असताना, सध्या प्रवाशांना स्वतःच मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विकासासाठी होणारा हा त्रास नागरिकांनी संयमाने घेतला असला, तरी धुळीचा त्रास आणि अपघातांची भीती यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट आहे.

या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी आता स्वतःहून ‘स्मार्ट’ नियोजनाचा अवलंब करणे गरजेचे ठरत आहे. कोळकी आणि आजूबाजूच्या परिसरातून फलटण शहरात येणाऱ्या वाहनधारकांनी बुवासाहेब मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा सल्ला दिला जात आहे. अनंत मंगल कार्यालय व महाराजा मंगल कार्यालय या मार्गे वळसा घेतल्यास, वेळ थोडा जास्त लागला तरी वाहतूक कोंडी आणि धुळीच्या त्रासापासून सुटका होणे शक्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने केवळ बांधकामाकडे लक्ष न देता, वाहतूक नियोजनासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. रस्त्यावर उडणारी धूळ थांबवण्यासाठी नियमित पाणी फवारणी करणे आणि गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस तैनात करणे आवश्यक आहे. विकासकामांचे आम्ही स्वागतच करतो, परंतु सर्वसामान्यांची सुरक्षितता आणि सुलभ वाहतूक यांच्याशी तडजोड केली जाऊ नये, अशी रास्त भावना फलटणकर व्यक्त करत आहेत.

Spread the love