फलटण शहरातील निकृष्ट पॅचवर्कवर नागरिकांचा संताप; मुख्याधिकाऱ्यांकडे कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल

दिखाव्यासाठी माती व मुरूम टाकून काम उरकल्याचा रहिवाशांचा आरोप; तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.

। लोकजागर । फलटण । १७ एप्रिल २०२६ ।

फलटण शहरात महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या पॅचवर्क कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः कसबा पेठ परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, येथील रहिवासी श्री. प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी या निकृष्ट कामाबाबत फलटण नगरपरिषदेकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, संबंधित रस्त्यांचे पॅचवर्क काम हे वर्क ऑर्डरमधील अटी व शर्तींनुसार दर्जेदार साहित्य वापरून होणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने केवळ दिखाव्यासाठी माती आणि मिक्स मुरुमाचा वापर करून हे काम उरकले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. निकृष्ट साहित्यामुळे अवघ्या काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था पुन्हा बिकट झाली असून, खडी विखुरल्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या पैशाचा असा अपव्यय होत असल्याबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी खानविलकर यांनी केली आहे. काम वर्क ऑर्डरप्रमाणे झाले आहे का याची खातरजमा करावी आणि जर काम निकृष्ट आढळले, तर संबंधित कंत्राटदार तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे अर्जात म्हटले आहे. तसेच निकृष्ट झालेले काम कंत्राटदाराकडून स्वखर्चाने पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे, अशी आग्रही मागणीही नागरिकांनी केली आहे.

शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने रस्ते सुस्थितीत होणे अपेक्षित असताना, केवळ कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी ही कामे उरकली गेली का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या तक्रारीनंतर आता फलटण नगरपरिषद प्रशासन संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करणार आणि रस्ते पुन्हा कधी दुरुस्त होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Spread the love