सद्गुरु शंकर महाराजांच्या पावन पादुकांचे भाविकांना दर्शन; ‘ओम दत्त ओम चिले’ भजनी मंडळाचे लाभले मोलाचे सहकार्य.
। लोकजागर । फलटण / विडणी । ९ जून २०२६ ।
फलटण तालुक्यातील विडणी येथील परमपूज्य सद्गुरु शिवाजी महाराज मंदिरात रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भक्तीच्या रंगात संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे धनकवडी (पुणे) येथील शंकरमहाराज मठातून आलेल्या श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पावन व जागृत पादुकांचे दर्शन विडणी व परिसरातील भाविकांसाठी आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यात आध्यात्मिकतेला फलटणच्या पत्रकारांनी मोठी साथ देत आपली सामाजिक व आध्यात्मिक पत्रकारिता जपली असल्याची कृतज्ञ भावना पुणे येथील शंकरमहाराज मठातील भक्तांनी व्यक्त करत सर्वांचे मनापासून आभार मानले.
सोहळ्याच्या दिवशी सकाळी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पवित्र पादुकांचे मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आणि जयघोषात आगमन झाले. यानंतर मुख्य विधींना सुरुवात झाली, ज्यामध्ये श्री सद्गुरू शंकर महाराज पादुका, श्री सद्गुरू शिवाजी महाराज समाधी, श्री सद्गुरू कुलकर्णी महाराज (आईसाहेब) मूर्ती आणि श्री सद्गुरू विठ्ठल महाराज (तात्या) समाधीस अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि मंगलमय वातावरणात अभिषेक करण्यात आला. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर श्रींची भव्य महाआरती संपन्न झाली. महाआरतीनंतर उपस्थित शेकडो भाविकांच्या साक्षीने श्री शंकरगीता पारायणास भक्तिभावाने प्रारंभ झाला. या संपूर्ण धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंदिरात मोठी गर्दी केली होती.
महाप्रसादाने सोहळ्याची सांगता: पारायण सोहळ्यादरम्यान संपूर्ण मंदिर परिसर आणि विडणी गाव सद्गुरुंच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्णपणे भारावून गेला होता. पारायणाची सांगता झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लाभ घेतला. श्रद्धा, भक्ती, आणि चैतन्याच्या अभूतपूर्व वातावरणात हा भव्य धार्मिक सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
या भव्य आणि स्तुत्य कार्यक्रमाचे नेटके आयोजन श्री मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांनी आपल्या विशेष पुढाकाराने व कष्टाने केले होते. या सोहळ्यासाठी व्यासपीठ चालक सौ. उर्मिलाताई निवंगुणे यांच्यासह फलटण येथील प्रसिद्ध सद्गुरू हरिबाबा मंदिर येथील ‘ओम दत्त ओम चिले’ भजनी मंडळ आणि स्वामी समर्थ मंडळ, फलटण यांच्या सर्व सदस्यांचे अत्यंत मोलाचे व भक्तीपूर्ण सहकार्य लाभले. विडणी येथील या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
